पुणे : परराज्यातून बनावट विदेशी मद्याच्या तस्करीचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघड केला. या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ३१ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संतोष सुनील मारकड (२१. रा. उरळीकांचन, हवेली) वैभव शिवाजी तरंगे (२२ रा. व्यंकटेशनगर, हवेली), आकाश बाळासाहेब कोडलिंगे ( रा. चंदनवाडी), कुणाल सुनील कोल्हे (रा. नांदूर), बबन देवचंद पावणे (रा. मोई, ता. खेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
उत्पादन शुल्क विभागाचे (एक्साईज) पथक गस्तीवर होते. पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस टोलनाक्याजवळून दाेन वाहने निघाली असून त्यामध्ये बनावट विदेशी मद्य असल्याची माहिती पथकाला मिळाली. पाटस टोलनाक्यावर सापळा लावून दोन वाहनांना अडविले. त्या वेळी संतोष मारकड आणि वैभव तरंगे यांच्याकडून गोव्यातील मद्याची ४३ खोकी जप्त करण्यात आली. चौकशीत जप्त करण्यात आलेले मद्य बनावट असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर आरोपी संतोष याच्या उरळी कांचन येथील घरी छापा टाकला. घरातून बनावट विदेशी मद्याची ११ खोकी, ५५९ बुचं आणि रिकाम्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
चौकशीत तपासात चंदनवाडीतील हॉटेल, नांदूर येथील हॉटेल आणि मोई (ता. खेड) येथील बबन पावणे याच्या घरावरही छापे टाकून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य, देशी दारू, बनावट बुचं, रिकाम्या बाटल्या आणि मद्य तयार करण्यासाठी लागणारे यंत्र जप्त करण्यात आले. विदेशी मद्य विक्री, तसेच निर्मिती प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली.
आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक उत्तम शिंदे, सुजित पाटील, निरीक्षक विजय रोकडे, एन. एस. देवणे, शहाजी शिंदे, एम. व्ही. गाडे, दिनेश सूर्यवंशी, सागर साबळे, विकास थोरात यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तस्करी करुन आणलेल्या परराज्यातील विदेशी मद्याच्या मोठा साठा जप्त केला होता. बनावट मद्य निर्मिती, तसेच परराज्यातील मद्य तस्करीविरुद्ध यापुढील काळात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अधीक्षक कानडे यांनी दिला आहे.