संगणक अभियंता आणि त्याच्या मेहुण्याने कट रचून एका सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीची ५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी सायबर सेलच्या अधिकाऱ्याने मुख्य सूत्रधार संगणक अभियंता प्रवीण विष्णुदास राठी याला अटक केली आहे. तर मेहुणा नवनीत कृष्णकुमार मोहता याचा शोध सुरु आहे. संबंधित कंपनीत ‘इ’ टेंडरिंग आणि ऑनलाइन व्यवहार केले जायचे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संगणक अभियंता प्रवीण विष्णुदास राठी हा बालेवाडी येथील एका सॉफ्टवेअर बनवण्याच्या कंपनीत काम करत होता. दरम्यान, त्याच कंपनीत ‘इ’ टेंडरिंग आणि ऑनलाइन व्यवहार केले जायचे. त्यासाठी फिर्यादी अजित अर्जुन कदम यांनी बालेवाडी येथील बँकेचे खाते लिंक केलेले होते. सर्व व्यवहार त्या बँक खात्यामधून व्हायचे.

ज्या सॉफ्टवेअर मधून हे सर्व व्यवहार केले जात त्याचा पासवर्ड आणि युजरनेम हा आरोपी राठीला माहीत होता. त्याचा गैरवापर करून त्याने आपल्या परराज्यातील मेहुण्याला सोबत घेऊन वेगवेगळ्या पाच बँक खात्यात ५ लाख ९ हजार रुपये पाठवले. याची तक्रार फिर्यादी अजित कदम यांनी सायबर सेलकडे केली होती. त्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या पथकाने केला. आरोपी प्रवीण राठीला अटक केली आहे.