पुणे : पुणे मेट्रोची रुबी हॉल ते रामवाडी या मार्गावरील सेवा या वर्षाच्या अखेरीस सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, येरवडा स्थानकाचे जिने रस्त्यावर येत असल्याने महापालिकेने बदल सुचविला. त्यामुळे या स्थानकाच्या प्रवेशद्वाराचे जिने महामेट्रोला दुसरीकडे हलवावे लागले. त्यातच आता नगर रस्त्यावरील काही नागरिकांनी येरवडा आणि रामवाडी स्थानके दुसरीकडे हलविण्यासाठी महामेट्रोला कायदेशीर नोटीस बजावली आहे. यामुळे या मार्गावरील सेवा सुरू होण्यास विलंब लागण्याची चिन्हे आहेत.

रुबी हॉल ते रामवाडी या मार्गावरील येरवडा स्थानकाचे जिने नगर रस्त्यावर येत होते. महामेट्रोकडून या जिन्यांसाठी खांब उभारणीचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु, स्थानिक नागरिकांनी वाहतूककोंडी होत असल्याने या कामाला विरोध केला. अखेर महापालिकेने हे जिने दुसरीकडे हलविण्यास महामेट्रोला सांगितले. त्यानुसार महामेट्रोने रचनेत काही बदल केले. या बदलामुळे येरवडा स्थानकाच्या जिन्याचे काही खांब पाडण्याची वेळ महामेट्रोवर आली. आता ते नव्याने उभारले जाणार आहेत.

हेही वाचा – देशात शिक्षणाचे झपाटयाने बकालीकरण, निर्बुद्धीकरण; ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे मत

येरवडा स्थानकाचा तिढा सुटताच नगर रस्त्यावरील नागरिकांनी महामेट्रोची कायदेशीर कोंडी केली आहे. नगर रस्ता नागरिक मंचाचे विंग कमांडर (निवृत्त) आशुतोष माश्रूवाला, नागरी हक्क कार्यकर्त्या कनीज सुखरानी आणि उमेश मगर यांनी ही नोटीस बजावली आहे. त्यांनी नोटिशीत म्हटले आहे की, येरवडा आणि रामवाडी ही मेट्रो स्थानके रस्त्याच्या विकास आराखड्यात येत आहेत. ही स्थानके रस्त्यात बांधण्यात आल्याने वाहतूककोंडी होत आहे. या स्थानकांमुळे नगर रस्त्याच्या विकास आराखड्यावर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे ही स्थानके खासगी अथवा सरकारी जागेत हलवावीत.

हेही वाचा – साडेचार लाख कोटींच्या घरविक्रीचा अंदाज; देशातील सात प्रमुख महानगरांबाबत ‘अनारॉक’चा आशावाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येरवडा, रामवाडी स्थानकांना आक्षेप का?

  • नगर रस्त्याच्या विकास आराखड्यावर स्थानकांचे अतिक्रमण
  • स्थानकांमुळे भविष्यात रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांची संख्या वाढणार
  • महामेट्रोकडून दोन्ही स्थानकांचे जिने ४५ मीटर रस्त्याच्या आतमध्ये
  • महामेट्रोकडून सध्या नगर रस्त्यावर सात मीटर अतिक्रमण
  • महामेट्रोच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा होऊन कोंडी
  • दोन्ही स्थानकांसाठी स्वतंत्र वाहनतळाचे नियोजन नाही

येरवडा स्थानकाच्या जिन्यांच्या रचनेचा प्रश्न आता सुटला आहे. याच वेळी नगर रस्त्यावरील येरवडा आणि रामवाडी ही मेट्रो स्थानके हलविण्याची नोटीस महामेट्रोला मिळाली आहे. त्याला आमच्याकडून कायदेशीर उत्तर दिले जाईल. – हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो