सुप्रिया सुळेंच्या पुढाकारामुळे पालकांची भेट
पुणे: औरंगाबाद जिल्ह्य़ातील कन्नड तालुक्यातील गावात आजोळी गेलेली मुले ४५ दिवसांनंतर आई-बाबांच्या कुशीत विसावली. खासदार सुप्रिया सुळे यांनी मुलांची भेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला. आजोळी अडकून पडलेली मुले आई-बाबांच्या कुशीत विसावल्यानंतर सुळे यांचे पालकांनी मनोमन आभार मानले.
नगर रस्त्यावरील खराडी भागात श्रीकांत तेली पत्नी सुरेखा, मुलगा कियान आणि मुलगी किमया वास्तव्यास आहेत. तेली दाम्पत्याची मुले दीड महिन्यांपूर्वी कन्नड तालुक्यातील अंधानेर गावी आजोळी गेली होती. त्याचवेळी टाळेबंदी लागू झाली. टाळेबंदीमुळे मुले आजोळी अडकून पडली होती. मुलांची आठवण होत होती. टाळेबंदी उठण्याची शक्यता वाटत असताना पुन्हा टाळेबंदीत वाढ करण्यात आली. त्यामुळे तेली दाम्पत्य मुलांच्या आठवणीमुळे व्याकुळ झाले. तिकडे आजोळी राहत असलेल्या मुलांना आई-वडिलांची आठवण होत होती. दररोज मोबाइलवरून संपर्क होत असला, तरी मुलांना आई-वडिलांना भेटण्याची ओढ लागली होती. आई-वडिलांची भेट होऊ शकत नसल्याने सहा वर्षांचा कियान दररोज रडायचा. आजी समजूत घालायची. मात्र, काही केल्या तो ऐकत नव्हता.
मुलांची आई सुरेखा मुलांच्या आठवणीमुळे व्याकुळ होत होत्या. अखेर त्यांनी खासदार सुप्रिया सुळेंचा मोबाइल क्रमांक मिळवला. सुरेखा यांनी त्यांची व्यथा मांडली. त्यानंतर सुळे यांनी मुलांना परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. आवश्यक ती परवानगी मिळाल्यानंतर सहा वर्षांचा कियान आणि नऊ वर्षांची किमया शनिवारी पुण्यात परतले. आई-बाबांच्या कुशीत दोघे जण विसावल्यानंतर तेली दाम्पत्याला आनंदाश्रू अनावर झाले.