पुणे : राज्यातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आता विशेष फेरी राबवण्यात येणार आहे. या फेरीची निवडयादी १९ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार असून, राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये अकरावीचे वर्ग सुरू झाल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत चार नियमित फेऱ्या, सर्वांसाठी खुला प्रवेश अशा पाच फेऱ्या राबवण्यात आल्या. नुकत्याच संपलेल्या सर्वांसाठी खुला प्रवेश या पाचव्या फेरीत ३ लाख २४ हजार ७६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. त्यानंतर विशेष फेरी ही सहावी फेरी जाहीर करण्यात आली आहे.
त्यानुसार बुधवारपर्यंत (१३ ऑगस्ट) विद्यार्थ्यांना नोंदणी आणि भाग एकमध्ये दुरूस्ती करता येणार आहे. १४ ऑगस्ट रोजी विशेष फेरीसाठीच्या रिक्त जागा संकेतस्थळावर प्रदर्शित केल्या जाणार आहेत. तर १९ ऑगस्ट रोजी विशेष फेरीची निवडयादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर १९ आणि २० ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे.
शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार अकरावीचे वर्ग सुरू करण्यासाठी ११ ऑगस्ट ही अंतिम मुदत दिली होती. या पार्श्वभूमीवर, राज्यभरातील १०० टक्के महाविद्यालयांमध्ये अकरावीचे वर्ग सुरू झाल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सांगितले.
राज्यभरात अद्यापही साडेनऊ लाख जागा रिक्त
यंदा राज्यातील ९ हजार ५२५ महाविद्यालयात २१ लाख ५० हजार १३० प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. केंद्रीय प्रवेशासाठी (कॅप) असलेल्या १८ लाख ७ हजार ४४६ जागांपैकी १० लाख ४२ हजार ७०९, तर कोटा प्रवेशाठीच्या ३ लाख ४२ हजार ६८४ जागांपैकी १ लाख ६० हजार ७३३ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे ९ लाख ४६ हजार ६८८ जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे.