शहरातील उड्डाणपूल, रस्ते तसेच इतर अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे आराखडे तयार करण्यात महापालिकेने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ सल्लागारांकडून चुका झाल्यामुळे पुण्यातील प्रकल्पांसाठी यापुढे तज्ज्ञ सल्लागार नेमण्याची पद्धत बंद करण्याचा विचार महापालिकेत सुरू झाला आहे. त्यासाठी देण्यात आलेला प्रस्ताव मंजूर झाल्यास सल्लागारांऐवजी महापालिकेतील अभियंत्यांवरच प्रकल्पांचे आराखडे तयार करण्याची जबाबदारी येईल.
शहरात अनेक उड्डाणपुलांची कामे यापूर्वी झाली असून काही उड्डाणपुलांची कामे सध्या सुरू आहेत. त्यात धनकवडी, हडपसर, सिंहगड रस्ता, अभियांत्रिकी महाविद्यालय येथील मोठय़ा उड्डाणपुलांचा समावेश आहे. या पुलांचे आराखडे चुकीचे झाल्यामुळे सर्व पुलांची कामे रखडली असून काही पुलांचे काम सुरू असतानाच त्यांचे आराखडे बदलण्याची वेळ आली आहे. अशा प्रकारांमुळे शहरभर वाहतुकीच्या कोंडीचा अनुभव वाहनचालकांना येत असून प्रकल्पांचा खर्चही कोटय़वधी रुपयांनी वाढला आहे.
जवाहरलाल नेहरू योजनेत शहरात वाहतूक सुधारणा, मलनिस्सारण यासह अनेक मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले होते. या प्रकल्पांचे नियोजन करणे, त्यांचे आराखडे तयार करणे, प्रकल्पांना मंजुरी आणणे वगैरे कामांसाठी तज्ज्ञ सल्लागार कंपन्यांची नेमणूक महापालिकेने केली आहे. विविध प्रकल्पांसाठी नेमलेल्या या सल्लागारांवर आतापर्यंत कोटय़वधी रुपये खर्च झाले असले, तरी सल्लागारांच्या कामांबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. महापालिका प्रशासनानेही वेळोवेळी त्यांची जबाबदारी सल्लागार कंपन्यांवर ढकलून प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण न होण्याला ठेकेदार वा सल्लागार जबाबदार असल्याची भूमिका वेळोवेळी घेतली आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून आता प्रकल्पांसाठी सल्लागार म्हणून बाहेरच्या कंपनीची नेमणूक न करण्याचा विचार महापालिकेत जोरात सुरू झाला असून त्यापुढे जाऊन आता तसा प्रस्तावच स्थायी समितीला देण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुष्पा कनोजिया यांनी हा प्रस्ताव दिला असून तो स्थायी समितीपुढे निर्णयासाठी आला आहे.
विविध मोठय़ा प्रकल्पांची कामे करण्यासाठी, त्यांचे आराखडे तयार करण्यासाठी, प्रकल्पांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिकेकडे अत्यंत तज्ज्ञ अभियंता वर्ग आहे. अशा कामांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रताही महापालिकेच्या अभियंत्यांकडे आहे. या अभियंत्यांचा महापालिकेने योग्य वापर करून घ्यावा तसेच अशा तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा एक स्वतंत्र विभाग करून त्यांच्याकडे प्रकल्पांचे आराखडे तयार करण्याचे काम द्यावे, असा प्रस्ताव आहे. त्यासाठी महापालिकेत डिपार्टमेंट ऑफ प्लॅनिंग-डिझाईन, रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट हा विभाग नव्याने स्थापन करण्याचीही सूचना करण्यात आली आहे. महापालिकेकडून ज्या प्रकल्पांची कामे सुरू केली जातील त्यांची कामे वेळेत होतील, तसेच गुणवत्तापूर्ण होतील आणि त्यासासाठी योग्य तोच खर्च होईल, ही जबाबदारी या नव्या विभागावर द्यावी. त्या बरोबरच महापालिकेतील इतर खात्यांच्या विकासकामांनाही तांत्रिक सल्ला वा अभिप्रायाची गरज भासल्यास याच विभागाने सल्ला द्यावा अशीही जबाबदारी या नव्या विभागाकडे असेल.
संग्रहित लेख, दिनांक 24th Apr 2015 रोजी प्रकाशित
तज्ज्ञ सल्लागारांचा सल्ला यापुढे नको..
महापालिकेने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ सल्लागारांकडून चुका झाल्यामुळे पुण्यातील प्रकल्पांसाठी यापुढे तज्ज्ञ सल्लागार नेमण्याची पद्धत बंद करण्याचा विचार महापालिकेत सुरू झाला आहे.
First published on: 24-04-2015 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Specialist consultant pmc project plane