वसतिगृह ते विद्यापीठ अंतर पाच ते सहा मिनिटांत गाठणे शक्य; ‘स्मार्ट’ योजनेचा विद्यार्थ्यांना फायदा

विद्यापीठातील वसतिगृह ते विद्यापीठाच्या मुख्य इमारतीचे अंतर तसे वीस मिनिटांचे. वाहन नसेल तर तेथपर्यंत पायी जाण्याशिवाय पर्यायच नसायचा. हे अंतर अवघ्या पाच ते सहा मिनिटांत गाठणे शक्य झाले आहे ते भाडेतत्त्वावरील सायकल योजनेमुळे! ‘स्मार्ट’ तंत्रज्ञानाचा अवलंब करून सुरू करण्यात आलेल्या ही सायकल योजना युवक, युवतींमध्ये चांगलीच प्रिय झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ही सायकल योजना म्हणजे अल्पदरात प्रवास आणि तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर याचे उदाहरण असल्याने विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे हे आकर्षण ठरले आहे.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत झुमकार-पेडल या कंपनीच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भाडेतत्त्वावरील सायकल योजनेला गेल्या आठवडय़ापासून सुरुवात झाली आहे. या योजनेत विद्यापीठात सुमारे शंभर सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी, विद्यापीठातील कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पाश्र्वभूमीवर सायकल वापरणाऱ्या विद्यार्थ्यांशी ‘लोकसत्ता’ने संवाद साधला. त्यावेळी त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांमधून ही योजना त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत असल्याचे स्पष्ट झाले.

विद्यापीठात शिकणारा केशव जाधव म्हणाला, सकाळी विद्यापीठातील तास पूर्ण करून संध्याकाळी पार्ट टाईम नोकरीसाठी विद्यापीठाच्या बाहेर जातो. रात्री विद्यापीठातील वसतिगृहात परतताना अनेकवेळा चालत जावे लागते किंवा लिफ्ट मागण्याशिवाय पर्याय उपलब्ध नव्हता. परंतु सायकल योजनेमुळे रात्री कितीही उशिरा आले तरी वसतिगृहापर्यंत सायकलने पोहोचणे सहज शक्य होते. मीरा झुंजरुक म्हणाली, मुख्य इमारत ते वसतिगृह हे अंतर आम्ही रोज पायी जायचो. कधी कधी सकाळी तासाला वेळेत पोहोचणे शक्य होत नाही, तसेच ‘कमवा शिका योजने’तदेखील आम्ही काम करतो. त्यामुळे रोज विद्यापीठात पाच ते सहा किमी अंतर पायी चालावे लागायचे. सायकल योजनेमुळे आता रोजची पायपीट बंद झाली असून वेळेची बचतही होत आहे.

विद्यापीठात शिकणारे अनेक विद्यार्थी सामान्य कुटुंबांतून आले आहेत. रिक्षा, कॅब ही साधने त्यांना परवडण्यासारखी नव्हती. विद्यापीठातून बाहेर पडण्यासाठी रिक्षाचालक जास्त पैसे आकारत. संध्याकाळी उशिरा येणाऱ्या विद्यार्थिनींना रिक्षाशिवाय पर्याय उपलब्ध नव्हता. आता कितीही उशीर झाला तरी विद्यापीठ प्रवेशद्वाराजवळ सायकल सहज उपलब्ध असतात. त्यामुळे वसतिगृहापर्यंत पोहोचण्याची चिंता दूर झाली आहे.  अध्र्या तासासाठी एक रुपया हा दर अत्यंत अल्प आहे. दिवसाचा विद्यापीठात फिरण्याचा खर्च हा विद्यार्थ्यांच्या खिशाला परवडण्यासारखा आहे. तसेच विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मोफत वायफाय सुविधा असल्याने स्मार्ट फोनद्वारे सायकल सहज बुक करता येते.

ग्रंथालयात रात्री उशिरापर्यंत थांबता येत नसे. पूर्वी जेवणाच्या वेळी ग्रंथालयातून वसतिगृहात गेल्यानंतर पुन्हा ग्रंथालयात जाणे शक्य होत नसे. परंतु आता सायकलचा पर्याय उपलब्ध असल्याने उशिरापर्यंत अभ्यास करणे शक्य होते. रात्री वसतिगृहावर कसे जाणार याची चिंता दूर झाली आहे. हा उपक्रम खरोखरच आमच्यासाठी फायद्याचा ठरत आहे.

धनश्री नलावडे, विद्यार्थिनी