राज्य परिवहन मंडळाच्या बसेसना त्यांच्या ठरलेल्या मार्गावरील खासगी धाब्यांवर थांबण्यास परवानगी नसतानाही ‘धाबा.. तिथे थांबा’, असेच धोरण एसटीचे चालक व वाहक अनुसरत असतात. चालक-वाहक आणि धाबामालक यांच्या साटेलोटय़ाचा फटका मात्र प्रवाशांना बसतो.
पुणे-सोलापूर, पुणे-नगर, पुणे-मुंबई मार्गासोबत इतर मार्गावर दररोज दीर्घपल्ल्याच्या अनेक बस धावतात. अनेकदा हा प्रवास सहा ते आठ तासांपेक्षा जास्त असतो. या दीर्घ प्रवासात बसचालक व वाहक यांच्यासाठी एसटी महामंडळाकडून बसस्थानकावर जेवणाची सोय केलेली असते. तसेच प्रवासात अशाच एखाद्या मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांसाठीही नाश्ता व जेवणासाठी बस थांबवावी अशा सूचना आहेत. मात्र, बसचालकांकडून या सूचनेचे पालन होतेच असे नाही. महामार्गाच्या कडेला अनेक खासगी धाबे सुरू असतात. त्यातील ज्या धाबामालकांकडून फुकट जेवण व बस थांबवली म्हणून १५० ते ३०० रुपयांची चिरीमिरी दिली जाते, त्याच धाब्यांवर बस थांबवली जाते. अशा धाब्यांवर प्रवाशांची मात्र प्रचंड लुबाडणूक होते. खाण्याच्या पदार्थापासून पिण्याच्या पाण्यापर्यंत सर्वच वस्तू अवाच्या सव्वा किमतीला प्रवाशांच्या हाती थोपवल्या जातात. याबाबत तक्रारी केल्यास त्या कोणाच्या खिजगणतीतही नसतात. ही परिस्थिती पुणे-सोलापूर, पुणे-नगर, पुणे-मुंबई महामार्गासोबत इतर रस्त्यांवरही सुरू आहे. याकडे एसटी प्रशासनाचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

कामाच्या निमित्ताने पुणे ते लातूर असा सारखा प्रवास करीत असतो. बस स्थानकावर एसटी थांबविण्याऐवजी चालकांकडून धाब्यावर थांबविली जाते. त्या ठिकाणी प्रवाशांची लूट होते. वाहक-चालकांना धाबेचालकांकडून पैसे मिळत असल्यामुळे या ठिकाणी बस थांबविल्या जातात. यामध्ये प्रवासी भरडले जातात. बसचालकांशी वाद घालूनही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.
-नितीन चौधरी, प्रवासी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्त्याच्या कडेला असलेल्या धाब्यावर बस थांबविण्याची परवानगी नसतानाही त्या ठिकाणी बस थांबविल्या जातात. धाबेचालकांकडून प्रवाशांची लूट केली जाते. हा सर्व प्रकार एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. अनेक धाब्यांवर एसटीचा अधिकृत थांबा असे फलक लावले असून ते अनधिकृत आहेत. याबाबत एसटी महामंडळाकडे पत्रव्यवहार व आंदोलनेदेखील केली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
 -अनिल बांडे, अध्यक्ष, शिरूर प्रवासी संघ