पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळमध्ये एक विधान केलं आहे. आचारसंहिता सुरू असताना अजित पवारांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार यांनी जाहीर सभेत मतदारांना आमिष दाखवल्याचं पाहायला मिळालं. ही निवडणूक महत्वपूर्ण आहे. नात्या-गोत्यावाल्यांना म्हणा. १३ तारखेला मतदान होणार आहे. त्यानंतर १४ तारखेला या. जेवण घालतो, पोशाख करतो, रुसू नये म्हणून अंगठी घालतो. असं विधान अजित पवार यांनी केलं आहे. ते मावळमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणूक महत्वपूर्ण आहे. नात्या- गोत्याचा विचार करू नका. नात्या-गोत्यावाल्यांना म्हणावं, १३ तारखेला मतदान होणार आहे. त्यांनतर १४ तारखेला या. जेवण घालतो, पोशाख करतो, रुसू नये म्हणून अंगठी घालतो. मग तुला घरी पाठवतो अस सांगा. पुढे ते म्हणाले, आता कोणाला बोलावण्याचा भानगडीत पडू नका. फोटो कोणीतरी काढेल.

आणखी वाचा-दहावीच्या परीक्षेसाठी राज्य मंडळाकडून शुल्कवाढ, किती रक्कम भरावी लागणार?

पुढे ते म्हणाले, आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो. रात्रीचे अकरा वाजले होते. मी तिथं गेलो. श्रीरंग बारणे यांच्या विरोधातील उमेदवार माझ्यावर लक्ष ठेवून बसला होता. आला की पठ्ठ्या पाया पडला. त्याने लगेच सोशल मीडियाला दादांनी आशीर्वाद दिले. असे फोटो व्हायरल केले. कशाचे आशीर्वाद दिले. बनवाबनवी करता का? आम्ही महायुतीच्या वतीने लढतो आहे. माझी भूमिका स्पष्ट असते. मी एकदा निर्णय घेतल्यानंतर कोणाच्या बापाचं ऐकत नाही. त्याच उमेदवाराचं इमाने इतबारे काम करतो. माझ्या राजकीय जीवनात मॅच फिक्सिंग कधी केली नाही. एकदा तिकीट देताना दादा विचार करतो. मग त्याला निवडून आणायला सर्वस्व पणाला लावतो. पुढे ते म्हणाले, विरोधकांची नौटंकी सुरू आहे. आपल्याला तिसऱ्यांदा श्रीरंग आप्पा बारणेंना निवडून आणायचं आहे.