पुण्यातील सांगवीमध्ये सावत्र पित्याने दोन मुली आणि भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित मुली या १२, १० आणि नऊ वर्षाच्या असून गेल्या वर्षभरापासून तो त्या तिघींवरही अत्याचार करत होता. पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे.
जुनी सांगवीमध्ये राहणा-या ३२ वर्षीय महिलेने दुसरे लग्न केले होते. या महिलेला पहिल्या पतीकडून १२ वर्षाची आणि १० वर्षाची अशा दोन मुली होत्या. लग्नानंतर त्या लहान मुली आई आणि सावत्र पित्यासोबत राहत होत्या. गेल्या वर्षभरापासून नराधम सावत्र पित्याने दोन्ही मुलींवर अत्याचार केला होता. काही महिन्यांपूर्वी हा प्रकार महिलेच्या लक्षात आला आणि तिने पोलिसांकडे जाण्याची तयारीही केली होती. मात्र बदनामी होईल असे सांगत नातेवाईकांनी तिला तक्रार करु दिली नव्हती. दोन दिवसांपूर्वी महिलेच्या मोठ्या मुलीला त्रास होत होता. महिलेने तिच्याकडे चौकशी केली असता सावत्र पित्याने अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले. यानंतर महिलेने थेट पोलीस ठाणे गाठले आणि पतीविरोधात तक्रार दाखल केली.




सावत्र पित्याने दोन मुलींसोबतच पत्नीच्या नऊ वर्षाच्या भाचीचेही लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि विनयभंग अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक केल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे.