ज्युनिअर केजी, सीनिअर केजी, पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी वयाचा निकष निश्चि
त करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने दिला. मात्र, त्या प्रस्तावाचा अद्यापही नियम झालेला नाही. त्यामुळे या वर्षीही शाळांची मनमानी कायम राहणार आहे. कोणतीही परिस्थिती आपल्या बाजूने वळवून फायदा घेणाऱ्या शिक्षणसंस्था या येऊ घातलेल्या नियमाचाही सोयीस्कर फायदा करून घेत आहेत. पुढील ‘वर्षांपासून नियम बदलणार आहेत, त्यामुळे या वर्षीच नर्सरीत प्रवेश घ्या’ अशी दुकानदारी नर्सरी शाळांनी सुरू केली आहे. नर्सरी शाळांमध्ये सर्रास २ किंवा अडीच वर्षांच्या मुलांना प्रवेश दिला जात आहे.
राज्यातील नर्सरी शाळांमध्ये तीन वर्ष पूर्ण झालेल्या मुलांनाच प्रवेश देण्यात यावा, असा प्रस्ताव राज्याच्या शिक्षण विभागाने शासनाकडे पाठवला आहे. पूर्वप्राथमिक शाळांमध्ये प्रवेशासाठीचे वयाचे निकष वेगवेगळे आहेत. त्यामुळे शिक्षण हक्क कायद्याच्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाला होता. त्या पाश्र्वभूमीवर प्रत्येक वर्गाच्या प्रवेशासाठी राज्यपातळीवर वयाचा एकच निकष करण्यात यावा असा प्रस्ताव शिक्षण विभागाने पाठवला. या वर्षीपासून हे निकष लागू करण्यात यावेत, असे या प्रस्तावात म्हणण्यात आले आहे. मात्र, या अहवालाचा अद्याप नियम झालेला नाही. त्यामुळे शिक्षण विभागाचे हे प्रयत्न उलट शाळांच्याच पथ्यावर पडले आहेत. अजून नियमच झाला नसल्यामुळे या वर्षीपासून वयाची अट आपल्याला लागू होतच नाही, अशी शाळांची भूमिका आहे. किंबहुना पुढील वर्षीपासून नियम बदलणार असल्यामुळे या वर्षी प्रवेश घ्या असे सल्ले देत २ ते अडीच वर्षांच्या मुलांना नर्सरी शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे.
शहरातील बहुतेक नावाजलेल्या, ‘स्टार’ शाळांची प्रवेश प्रक्रिया डिसेंबरअखेपर्यंत पूर्ण होत आहे. अनेक शाळांनी १ डिसेंबरलाच प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याचे जाहीर केले आहे. प्रत्येक शाळेचे प्रवेशासाठीचे वेगवेगळे वय आणि प्रवेशाची स्वतंत्र वेळापत्रके यामुळे पालकांची सध्या धावपळ होत आहे. येत्या काळात वयाच्या निकषाचा प्रस्ताव नियमात बदलला तरी तोपर्यंत शाळांची प्रवेश प्रक्रिया झालेली असल्यामुळे या वर्षी वयाचा नियमही शिक्षण विभागाला बासनातच ठेवावा लागणार आहे. प्रत्येक नियमातून पळवाटा शोधणाऱ्या शिक्षणसंस्था आणि प्रत्येक बाबतीत उशिरा जागे होणारा शिक्षण विभाग यांच्या दरवर्षीच्या जुगलबंदीत पालक आणि मुलांचे मात्र हाल होत आहेत.