परीक्षांचे निकाल वेळेत न लावण्याची विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची परंपरा अजूनही सुरूच आहे. विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेची परीक्षा होऊन तब्बल अडीच महिने झाले, तरीही अजूनही निकाल जाहीर झालेले नाहीत.
पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षा नोव्हेंबर २०१३ मध्ये झाल्या. मात्र, अजूनही अभियांत्रिकी शाखेचे निकाल जाहीर झाले नसल्याची तक्रार विद्यार्थी करत आहेत. परीक्षा झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसांमध्ये निकाल जाहीर करण्याचा नियम आहे. मात्र, तरीही परीक्षा होऊन तब्बल अडीच महिने झाले तरीही अभियांत्रिकी शाखेचे निकाल जाहीर झालेले नाहीत. अभियांत्रिकी शाखेच्या सर्वच वर्षांचे आणि शाखांचे निकाल जाहीर होणे बाकी आहेत. प्रश्नपत्रिकांच्या मूल्यमापनाचे काम वेळेत होऊनही विद्यापीठाकडून निकाल खोळंबले असल्याची शिक्षकांचीही तक्रार आहे. अभियांत्रिकीचे निकाल जाहीर होण्यासाठी अजून आठ दिवस लागणार असल्याचे परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहेत.
विद्यापीठाकडून निकाल आणि त्यानंतर पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्यामध्ये होणाऱ्या दिरंगाईचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. मात्र, निकालांना होणार विलंब, निकालामधील चुका अशा अनेक गोष्टींवर विद्यापीठाच्या अधिकार मंडळांमध्ये वारंवार चर्चा होऊनही प्रत्यक्षात निकाल वेळेवर लागण्यासाठी त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे दिसत आहे.