पुणे : ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीच्या (डीपीईएस) खराडी येथील परिसरात ‘लार्जेस्ट ऑडियन्स ॲट कँम्पफायर स्टोरीटेलिंग’ हा नवीन विश्वविक्रम नोंदविण्यात आला. संस्थेच्या आवारात मोठ्या शेकोटीभोवती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील गोष्टी सांगण्यात आल्या. या उपक्रमात शेकोटीभोवती झालेल्या सर्वाधिक गर्दीचा विक्रम ‘गिनिज् बुक ऑफ वर्ल्ड’मध्ये नोंदवण्यात आला आहे.
संस्थेच्या वतीने निवेदनाद्वारे ही माहिती देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाला आहे. त्यानिमित्ताने ‘डीपीईएस’च्या खराडी येथील आवारात एका मोठ्या शेकोटीभोवती लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘शिवाजी महाराज आणि त्यांच्या या १२ किल्ल्यांच्या गोष्टी सांगितल्या. या उपक्रमात ४ हजार ६२३ श्रोत्यांनी सहभागी होत विश्वविक्रम नोंदवला. परिक्षणासाठी खास लंडनहून आलेले गिनीज् वर्ल्ड रेकॉर्डसचे वरिष्ठ पंच प्रवीण पटेल यांच्या हस्ते ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सागर ढोले पाटील यांना या विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
“कँम्पफायर स्टोरीटेलिंग’ ही संकल्पना जगभरातील गिर्यारोहकांमध्ये लोकप्रिय आहे. या श्रेणीमध्ये गिनीज् विश्वविक्रम केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या किल्ल्यांची माहिती देशाबाहेरील गिर्यारोहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल,’ असे सागर ढोले पाटील यांनी सांगितले.
एका वर्षात तिसरा विश्वविक्रम
ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीने एक वर्षाच्या आत हा तिसरा विश्वविक्रम केला आहे. यापूर्वी आठ तासात एक हजार व्यक्तींना कृत्रिम अवयव बसविण्याचा आणि गणेशोत्वाच्या काळात सर्वाधिक १ हजार ७२४ नागरिकांच्या सहभागाने दिवे ओवाळून एकत्रित आरती करण्याचा विश्वविक्रम गिनिज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सागर ढोले पाटील यांनी दिली.
नुकतीच छत्रपतीच्या शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत स्थान देण्यात आले आहे. त्यानिमित्ताने शिवरायांच्या १२ किल्ल्यांचे महत्व आणि त्यांच्या गोष्टी नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. शिवरायांच्या प्रेरणेनेच तो यशस्वीही झाला.– सागर ढोले-पाटील, अध्यक्ष, ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी
