पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने श्रेयांक, कौशल्य अभ्यासक्रमांच्या वाढवलेल्या शुल्काला विद्यार्थी संघटनांकडून विरोध करण्यात आला आहे. काही अभ्यासक्रमांचे वर्ग होत नसतानाही शिक्षण शुल्क आकारले जात असल्याचा प्रकार होत असल्याबाबत आक्षेप नोंदवण्यात आला.
विद्यापीठाकडून विविध विद्याशाखांतील अभ्यासक्रमांमध्ये काही श्रेयांक आणि कौशल्य अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यात ह्युमन राइट्स, सायबर सुरक्षा अशा काही अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाकडून शुल्क आकारणी केली जाते. २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये या अभ्यासक्रमांसाठी शुल्कवाढ करण्यात आली. उदाहरणार्थ ह्युमन राइट्स या विषयाचे शुल्क दोनशेवरून एक हजार करण्यात आले. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमांचे गुण निकालामध्ये धरले जात नाहीत. काही अभ्यासक्रम मूक्स या ऑनलाइन पद्धतीने शिकवले जातात. असे असतानाही या अभ्यासक्रमांसाठी शुल्कवाढ करण्यात आली. या शुल्कवाढीबाबत लोकसत्ताने सप्टेंबरमध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते. आता विद्यार्थी संघटनांकडून या शुल्कवाढीला विरोध करण्यात येत आहे.
अधिकच्या श्रेयांक अभ्यासक्रमासाठी करण्यात आलेली शुल्कवाढ रद्द करावी. ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरले असेल, त्यांना ती रक्कम परत करण्यात यावी, असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे दयानंद िशदे यांनी सांगितले. तसेच विद्यापीठाच्या भोजनगृहातील जेवणाचा दर्जा सुधारण्याची गरज आहे. या मागण्यांबाबत विद्यापीठाने निर्णय न घेतल्यास १३ मे रोजी आंदोलन करण्यात येणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
करोना काळात शुल्क कपातीचे आदेश असताना विद्यापीठाने श्रेयांक अभ्यासक्रमांच्या शुल्कात वाढ केली. ही बाब निदर्शनास आणून दिल्यावर समिती स्थापन करण्याचे आश्वासन विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आले. आता कित्येक महिने उलटूनही त्याबाबत समिती स्थापन केलेली नाही आणि निर्णयही झाला नाही. आता विद्यापीठ प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल, असे युक्रांदचे शहर कार्यवाह कमलाकर शेटे यांनी सांगितले.
श्रेयांक अभ्यासक्रमातील काही अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाने सांगितल्यानुसार, तर काही राज्य शासनाने सांगितल्यानुसार राबवले जातात. काही अभ्यासक्रमांची प्रत्यक्ष व्याख्याने होत नसल्याची तक्रार आहे. मात्र ही व्याख्याने घेण्याची सूचना केली जाईल. शुल्कासंदर्भातील मागणी विद्यापीठातील शुल्क समितीसमोर ठेवून त्याबाबत निर्णय घेतला जाईल.
– डॉ. एन. एस. उमराणी प्र कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ