गावी जाणाऱ्या विद्यार्थी, कामगारांची परवान्यासाठी गर्दी

पुणे : टाळेबंदीत शहरात अडकून पडलेले विद्यार्थी, परप्रांतीय कामगार, पर्यटकांना मूळ गावी पाठविण्यासाठी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आल्यानंतर सोमवारी शहरातील विविध पोलीस ठाण्यांसमोर गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. दिवसभरात पंधरा हजार नागरिकांनी अर्ज केले. त्यातील सर्वाधिक अर्ज उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील नागरिकांचे आहेत.

शहरात अडकून पडलेल्या नागरिकांना मूळ गावी पाठविण्यासाठी पुणे पोलिसांनी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र कक्ष (मायगंट्र सेल) स्थापन केला आहे. राज्याअंतर्गत तसेच परराज्यात जाणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी परवानगी देण्यासाठी पोलिसांकडून माहिती संकलित करण्यात येत आहे. मूळ गावी जाणाऱ्या नागरिकांनी शहरातील वेगवेगळ्या भागात असलेल्या पोलीस ठाण्यांसमोर सोमवारी सकाळपासून गर्दी केली होती. स्वारगेट, वारजे पोलीस ठाण्याच्या बाहेर रांगा लागल्याचे दृश्य पाहायला मिळाले. पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

समूह स्वरुपात राज्याअंतर्गत तसेच परराज्यात प्रवासास परवानगी देण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून पुणे महानगर विकास प्राधिकरणातील  पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांची नेमणूक करण्यात आली आहे. गावी जाणाऱ्यांची माहिती संकलित करण्यात येत असून प्रत्येक पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक आणि चार कर्मचारी नेमले आहेत.

वारजे भागात गर्दी पांगवली

वारजे भागात मोठय़ा संख्येने परप्रांतीय कामगार, मजूर वास्तव्यास आहेत. मूळ गावी परतू इच्छिणाऱ्यांची सोमवारी वारजे पोलीस ठाण्यात गर्दी झाली होती. सामाजिक अंतरदेखील पाळले जात नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत गर्दी पांगवली.