scorecardresearch

ऑफलाइन परीक्षेविरोधात पुण्यातही विद्यार्थ्यांचे आंदोलन

राज्य मंडळातर्फे होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या ऑफलाइन परीक्षेविरोधात राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचे पुण्यातही पडसाद उमटले.

पुणे : राज्य मंडळातर्फे होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या ऑफलाइन परीक्षेविरोधात राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचे पुण्यातही पडसाद उमटले. पुण्यातील विद्यार्थ्यांनीही एकत्र येऊन ऑफलाईन परीक्षेला विरोध केला. शिक्षण ऑनलाइन झालेले असताना परीक्षा ऑफलाइन का, मंत्री-अधिकाऱ्यांच्या बैठकाच ऑनलाइन होतात तर आमच्या परीक्षा ऑफलाइन का, असे प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले.

राज्य मंडळाच्या वेळापत्रकानुसार दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल तर बारावीची परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत होणार आहे. तसेच तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहेत. तर फेब्रुवारी-मार्चमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षांविरोधात राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांकडून मोठय़ा संख्येने येऊन विरोध करण्यात आला. पुण्यातील विद्यार्थ्यांनीही ऑफलाइन परीक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले. परीक्षा नको अशी भूमिका नाही, पण अभ्यासक्रम कमी केलेला असूनही तो पूर्ण शिकवून झालेला नाही. ऑनलाइन पद्धतीने अध्यापन झालेले असल्याने परीक्षा ऑफलाइन कशासाठी हा प्रश्न आहे. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्याव्यात किंवा गेल्यावर्षीप्रमाणे मूल्यमापन करून निकाल जाहीर करावा, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. 

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने  ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेणे शक्य नाही. परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन राज्य मंडळाने केले आहे.

– शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Students agitation pune against offline exams ysh

ताज्या बातम्या