मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या आदेशानंतर विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी ‘श्रेयांक’ पद्धत अमलात आणली असली, तरीही विद्यार्थ्यांच्या गुणवतेचा निकष म्हणून ‘गुण’च ग्राह्य़ धरले जातात. अगदी विद्यापीठाच्या शिष्यवृत्ती योजनाही त्यासाठी अपवाद नाहीत. मात्र प्रत्यक्ष गुण आणि श्रेयांकानुसार गुणपत्रिकेवर दिलेली श्रेणी यामधील गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.
यापूर्वी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार केले जात असे. मात्र मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या आदेशांनंतर देशभरातील विद्यापीठांनी श्रेयांक प्रणाली लागू केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी श्रेयांक पद्धती लागू आहे. त्यामुळे ‘किती टक्के मिळाले’ या ऐवजी आता ‘कोणती श्रेणी मिळाली किंवा किती श्रेयांक’ आहेत असे गुणवत्तेचे मोजमाप होऊ लागले आहे. विद्यापीठांनी हा बदल केला असला तरी शासकीय व्यवस्था, अनेक शिष्यवृत्ती योजना अजूनही विद्यार्थ्यांचे गुणच गृहीत धरतात. विद्यापीठाकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीही त्याला अपवाद नाहीत. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर दिसणारी श्रेणी, त्याचे श्रेयांक आणि गुणपत्रकाच्या मागे कोणती श्रेणी म्हणजे ढोबळमानाने किती गुण याचा दिलेला तक्ता यांमध्ये तफावत आढळते. या गोंधळात विद्यापीठाने श्रेयांकाचे गुणांत रूपांतर करण्यासाठी दिलेल्या सूत्राचीही भर पडली आहे. या गोंधळामध्ये विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होते आहे.
शासकीय संस्थांही अजून ‘गुण’ याच संकल्पनेवर विश्वास ठेवताना दिसतात. त्यामुळे पात्रतेचा निकष हा गुणांमध्ये दिलेला असतो. अशा वेळी विद्यार्थ्यांना मिळालेल्या श्रेणीचे गुणांमध्ये रूपांतर करून घ्यावे लागते किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग, परीक्षा परिषद यांसारख्या परीक्षा घेणाऱ्या स्वायत्त संस्थांना विद्यापीठांशी संपर्क साधून गुणांची मागणी करावी लागते. या सगळ्या प्रक्रियेत परीक्षा मंडळांचा वेळही वाया जातो आहे. प्रत्येक विद्यापीठाच्या सूत्रामध्येही थोडा फरक असल्याचे दिसते. त्यामुळेही विद्यार्थ्यांचे नुकसान होते. विद्यापीठाने दिलेल्या सूत्रानुसार केलेले रूपांतर आणि विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष गुण यातही तफावत येत असल्याचे काही प्राध्यापकांनी सांगितले. अशा वेळी रपांतर करण्यापेक्षा विद्यार्थ्यांला मिळालेल्या मूळ गुणांचा संदर्भ घेतला जातो अशी माहिती प्राध्यापकांकडून देण्यात आली.
काय घडते?
– एका विद्यार्थ्यांला ‘ए’ श्रेणी आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांला ‘ओ’ म्हणजे सर्वोच्च श्रेणी मिळते. मात्र प्रत्यक्षात या दोघांचे प्रत्यक्ष गुण हे सारखे असतात.
– विद्यार्थ्यांला मिळालेली श्रेणी, श्रेयांक आणि गुणपत्रकाच्या मागे दिलेली गुणांची टक्केवारी याचा ताळमेळ बसत नाही.
– पात्रतेच्या निकषांनुसार श्रेणीचे गुणांत रूपांतर करण्यासाठी अडचणी येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students confused points category
First published on: 15-04-2016 at 03:34 IST