पुणे : तीन वर्षांच्या श्वानाला जन्मापासून एकच मूत्रपिंड असल्याने त्याला हर्नियाचा त्रास होता. गेल्या काही महिन्यांपासून त्यावर उपचारही सुरू होते. मात्र, औषधोपचारांनी अपेक्षित परिणाम न साधल्याने त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. भारतामध्ये श्वानावर झालेली अशा प्रकारातील ही बहुदा पहिली शस्त्रक्रिया असल्याचा दावा रुग्णालयाकडून करण्यात आला आहे.

डॉ. नरेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखालील स्मॉल अ‍ॅनिमल क्लिनिक येथे डॉ. शशांक शाह यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी के ली. या पाळीव श्वानाचे वय तीन वर्षे आहे. त्याला जन्मापासून एकच मूत्रपिंड आहे. त्यामुळे मागील वर्षभरापासून त्याला हार्नियाचा त्रास होता.

उलटय़ा, अतिसार, पाठीत कळ येणे, पोटात दुखणे, श्वासोच्छवासात अडचणी आणि सतत लाळ गळणे अशी लक्षणे या श्वानाला दिसत होती. विविध चाचण्यांनंतर श्वानाच्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रक्रिया दोन तास चालली. शस्त्रक्रियेनंतर १५ दिवस श्वानाला द्रव पदार्थावर ठेवण्यात आले. मात्र, आता प्रकृतीच्या सर्व तक्रारी दूर झाल्या आहेत, अशी माहिती श्वानाचे पालक दिनेश कथुरिया यांनी दिली.  डॉ. शशांक शाह म्हणाले,की शस्त्रक्रियेनंतर या श्वानाचा दिनक्रम पूर्ववत झाला आहे. प्राण्यांनाही मनुष्यासारखेच आजार किं वा वेदना होतात. त्यांचे योग्य निरीक्षण के ले असता ते आपल्या लक्षात येते. जवळच्या पशुवैद्यकांचा सल्ला घेणे प्राण्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपयुक्त ठरते.