scorecardresearch

पुणे: ससून रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीची आत्महत्या; नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय

बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युवतीने ससून रुग्णालयातील इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली.

sasaun hospital suicide dead आत्महत्या
ससून रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीची आत्महत्या

बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युवतीने ससून रुग्णालयातील इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. युवतीने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.आदिती दलभंजन (वय २०, रा. सिंहगड रस्ता) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. आदिती बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकत होती. बुधवारी (२९ मार्च) आदितीची परीक्षा होती. आदितीला महाविद्यालयात सोडण्यासाठी पालक आले होते. तिला महाविद्यालयात सोडून ते कामाला गेले.

सकाळी साडेदहाच्या सुमारास आदिती ससून रुग्णालयातील जुन्या इमारतीच्या गच्चीवर गेली आणि तिने गच्चीवरुन उडी मारली. आदिती आवारात कोसळली.गंभीर जखमी झालेल्या आदितीचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आवारात धाव घेतली.

हेही वाचा >>>VIDEO : “जमिनीशी नाळ असलेलं राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपलं”, गिरीश बापट यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली!

बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी पोलिसांना आदितीचा मोबाइल संच सापडला आहे. तपासासाठी पोलिसांनी मोबाइल संच ताब्यात घेतला आहे. आदितीच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली असून या प्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 16:52 IST

संबंधित बातम्या