सूर्य म्हणजे अवकाशातील तेजोगोल! त्याच्या या प्रकाशित रूपालाही कधीतरी डाग लागू शकतो हे सामान्य माणसाला माहीत असतेच असे नाही. सूर्यावर सध्या असाच एक डाग दिसत असून तो पुढील सुमारे महिनाभर नुसत्या डोळ्यांनीही पाहता येणार आहे. मात्र, या डागाचे निरीक्षण करताना थेट सूर्याकडे बघू नये तर तो ‘सोलर गॉगल’ वापरून पाहावा, असा सल्ला खगोल अभ्यासकांनी दिला आहे. हा डागाचा विस्तार सुमारे २ लाख किलोमीटर इतका प्रचंड आहे.
वैज्ञानिकदृष्टय़ा सांगायचे तर सूर्यावरील अनेक सौर चुंबकीय क्रियांचा तो परिणाम असतो. तर, या संधीचा खगोलवैज्ञानिक व सामान्य लोकांनी जरूर घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईच्या नेहरू तारांगणाचे संचालक अरविंद परांजपे यांनी दिलेल्या माहितीनुसार या सौरडागाचे नामकरण ‘एआर १९६७’ असून (क्रियाशील १९६७) असे करण्यात आले आहे. सूर्यावरील हा डाग दोन लाख किलोमीटरचा आहे. पृथ्वीसारखे अनेक ग्रह मावतील एवढा त्याचा आकार आहे. साधारणपणे सौरडागाचे आयुष्य हे काही तास ते काही दिवस असते, पण काही मोठे सौरडाग हे महिनाभर किंवा त्याहून अधिक काळ राहू शकतात.
असाच सौरडाग जानेवारी २०१४ च्या पहिल्या आठवडय़ात दिसला होता. त्याचे नाव ‘एआर १९४४’ असे होते. सूर्य त्याच्या अक्षावर महिन्यातून एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. सौरडाग एआर १९४४ हा सूर्याच्या मागच्या बाजूला गेला असून तो आता पुन्हा दिसत असून त्याचे नाव ‘एआर १९६७’ असे आहे. सौरडाग हे सूर्यावरील चुंबकीय क्षेत्र व त्याचे फिरणे याच्याशी संबंधित असते. सूर्य हा वायुरूप घटक असून तो एका भ्रमणाला खूप काळ घेतो. विषुववृत्तीय प्रदेशात त्याचे रोटेशन ३० दिवसांचे असते तर ध्रुवीय क्षेत्रात ते ३० दिवसांपेक्षा जास्त असते. सौरडाग हे गडद दिसतात तेव्हा त्यांचे अस्तित्व जाणवते, असे परांजपे यांनी सांगितले.
या सौरडागांचे तापमान ४५०० अंश सेल्सियस असते व त्याच्या भोवतालाचे तापमान २००० अंश सेल्सियस असते.  सौरडागांचे चक्र हे अकरा वर्षांचे असते. दर पाच वर्षे सहा महिन्यांनी सौर क्रियाशीलता वाढते व नंतरची साडेपाच वर्षे ती कमी होते व नंतर पुन्हा वाढते. सौरडाग चक्राच्या अंती सूर्याचे चुंबकीय ध्रुव बदलतात व उत्तर ध्रुव हा दक्षिण ध्रुव होतो तर दक्षिण ध्रुव हा उत्तर ध्रुव होतो. सौर खगोलनिरीक्षक हे आताच्या सौरडागावर लक्ष ठेवून आहेत व केव्हाही सूर्याचे चुंबकीय अक्ष बदलले जाऊ शकतात, ही घटना दुर्मीळ नसली तरी महत्त्वाची मानली जात आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सौरडागाचे नाव
जानेवारी २०१४- एआर १९४४
फेब्रुवारी २०१४- एआर १९६७
सूर्याचे तापमान- सुमारे ४५०० अंश सेल्सियस
डागाचा आकार- २ लाख किलोमीटर
डागाच्या आसपासचे तापमान- २००० अंश सेल्सियस
सौर डाग पाहताना सौर गॉगलचा वापर करावा
सौरडागांचे चक्र ११ वर्षांचे चक्र आता अंतिम टप्प्यात

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sun spot
First published on: 06-02-2014 at 03:13 IST