राज्याच्या राजकारण जे सुरू आहे ते दुर्देवी आहे. विरोधक हा वैचारिक विरोध करतो, बदल्याची भाषा त्यात नसते. बदला घेतल्याची भाषा पहिल्यांदा ऐकली, हे अतिशय दुदैवी आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

उद्धव ठाकरे यांचा बदला घेतल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर बारामती येेथे पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. राज्यात सध्या जे काही सुरू आहे ते अस्वस्थ करणारे आहे, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.
सुळे म्हणाल्या, की यापूर्वीही राजकीय कटुता होती. पण सध्या जे सुरू आहे ते मला अस्वस्थ करणारे आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांच्याबाबत जो काही प्रकार सुरू आहे तो अस्वस्थ करणारा आहे. ज्या संस्कृतीत मी वाढले, ती ही संस्कृती नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा आपण जपतो आणि जपायला हवा. ज्येष्ठ नेत्यांच्या तोंडी बदल्याची भाषा अयोग्य आहे.

खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी केली आहे. या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. विरोधकांकडे बोलण्यासाठी सध्या काही उरले नाही. त्यामुळे जुने विषय काढून विरोधक ते उगाळत आहेत, असेही सुळे यांनी सांगितले.