पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पक्ष एकत्र येण्याची चाचपणी करत आहेत. पिंपरीत आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना प्रस्ताव दिला आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला. यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहर तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते. सलग १५ वर्षे महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. परंतु, भाजपने २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला काबिज केला. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सहभागी आहे. परंतु, भाजप महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पवार यांनीही स्वबळावर लढण्याची तयारी ठेवण्याची सूचना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केली आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची शहरात ताकद कमी आहे. पक्षासोबत केवळ दोन माजी नगरसेवक आहेत. भोसरीतून पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढविलेले अजित गव्हाणे हे समर्थकांसह पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात गेले आहेत. चिंचवडमधून लढलेले राहुल कलाटे तटस्थ आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची शहरातील ताकद कमी झाली. या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र महापालिका निवडणूक लढविण्याची चाचपणी सुरू केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले, महापालिका निवडणूक एकत्र लढविण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून प्रस्ताव आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांची अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी अंतिम बोलणे व्हायचे आहे. एकत्र लढण्यास हरकत नसल्याचे अजित पवार यांना सांगितले आहे. मतांचे विभाजन होऊ नये यासाठी एकत्र आले पाहिजे. राजकारण बेरजेचे असले पाहिजे. वेगळे लढलो, तर भाजपला त्याचा फायदा होईल. दोन्ही पक्ष एकत्र लढल्यास पक्षाच्या कार्यकर्त्यांना आनंद होईल. जागा वाटपाचा निर्णय अजित पवार यांचा राहील.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले, भाजपला रोखण्यासाठी शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या पक्षांसोबत युती होऊ शकते. भाजपच्या विरोधात जे आहेत, त्यांच्यासोबत जाण्यास तयार आहोत. याबाबत वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल. जागा वाटपात कोणतीही अडचण येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या शहराध्यक्षांसोबत चर्चा करणार आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तरी त्याचा भाजपवर परिणाम होणार नाही. त्यांच्याशी लढाई करण्यास भाजप कार्यकर्ते सक्षम आहेत. भाजपने १२८ जागांवर लढण्याची तयारी केली आहे, असे भाजपचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी सांगितले.
