उरुळी देवाची आणि फुरुसुंगी येथील कचरा डेपोची समस्या ९ महिन्यात सोडवू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, २३ महिने उलटल्यानंतरही परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पुणे शहरातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यामध्ये सरकार अपयशी ठरले आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले आहे. उरुळी देवाची आणि फुरुसुंगी डेपोमध्ये पुणे शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामस्थ विरोध करत आहेत. मागील १३ दिवसांपासून पुणे शहरातील कचरा टाकण्यास ग्रामस्थांनी विरोध केला आहे. यापार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी विरोध करणाऱ्या ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

यावेळी सुप्रिया म्हणाल्या, भाजप सरकार राज्यात आल्यावर पुणे शहरातील कचरा प्रश्न प्रश्न ९ महिन्यात मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. घोषणा करून आज तब्बल २३ महिन्याचा कालावधी होऊन गेला. या प्रश्नावर एक ही बैठक घेण्यात आलेली नाही. आमच्या सत्तेच्या काळात देखील कचरा प्रश्न निर्माण झाला. आम्ही पर्याय काढयाचो. मात्र, हे सरकार कचरा प्रश्न मार्गी लावण्यात अपयशी ठरले आहे, मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यानी दिलेला शब्द पाळावा, असेही त्या म्हणाल्या.

फडणवीस पुण्यातील कचरा प्रश्नाकडे दुर्लक्षित करत असल्याचे सांगत सुप्रिया म्हणाल्या की, मुख्यमंत्री सोशल मिडिया कायम सक्रिय असतात. त्यावर लगेच उत्तर देतात. त्यामुळे दोन दिवसापूर्वी पुण्यातील कचरा प्रश्नावर मुख्यमंत्र्याना ट्विट केले होते. मात्र, त्यांनी ट्विटला उत्तर देखील दिले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पुण्यातील गंभीर समस्येकडे दर्लक्ष करत आहेत, असे वाटते. याप्रकरणी लकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.