पिंपरी : शहरातील जलनिस्सारण वाहिन्या (ड्रेनेज लाइन) जुन्या झाल्याने तुंबण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे महापालिकेने या वाहिन्यांचे आणि नैसर्गिक नाल्यांचे सर्वेक्षण हाती घेतले आहे. जलनिस्सारण वाहिन्या अद्ययावत करण्यात येणार असून, त्यासाठी तीनशे कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या सर्वेक्षणानंतर वाहिन्या आणि नाल्यांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे नियोजन आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात एक हजार ६०० किलोमीटर लांबीच्या जलनिस्सारण वाहिन्या, ५३ मोठे नैसर्गिक नाले आहेत. जलनिस्सारण वाहिन्या नगरपालिकेच्या काळातील ३५ वर्षांपूर्वीच्या आहेत. काही भागांत नव्याने वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांत लोकवस्ती वाढल्याने सांडपाणी मोठ्या प्रमाणात तयार होते. मात्र, वाहिन्या जुन्याच असल्याने त्या तुंबण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मध्य प्रदेशातील इंदूरच्या धर्तीवर शहरातील सर्व जलनिस्सारण वाहिन्या आणि नाल्यांचे सर्वेक्षण हाती घेतले आहे. त्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. शहराचे चार भागांत विभाजन करून वर्षभरात सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात येईल. सर्वेक्षणासाठी संबंधित संस्थेला प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या दीड टक्के शुल्क दिले जाणार आहे.

हेही वाचा >>>आला पावसाळा, आरोग्य सांभाळा!…हवामानातील बदलामुळे साथरोगांमध्ये वाढ

सर्वेक्षणाच्या माध्यमातून जुन्या, नादुरुस्त वाहिन्या कोणत्या समजणार आहे. त्यामुळे सांडपाणी कोठे तुंबते, कशामुळे तुंबते याबरोबरच कोणत्या भागात अधिक क्षमतेच्या वाहिन्यांची गरज आहे हे स्पष्ट होणार आहे. सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेकडून वाहिन्या आणि नाल्यांचा संपूर्ण आराखडा महापालिकेस सादर केला जाणार आहे. त्यानुसार महापालिका जलनिस्सारण वाहिन्या आणि नाल्यांचे काम करणार आहे.

हेही वाचा >>>पुणे: भीमाशंकर-कल्याण बस गिरवली येथे उलटली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या आदेशानुसार जलनिस्सारण वाहिन्या, नाल्यांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यानंतर वाहिन्या, नाल्यांचे अद्ययावतीकरण करण्यात येईल. त्यासाठी ३०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. केंद्राचे अनुदानही मिळणार आहे. या कामामुळे जलप्रदूषण रोखणे शक्य होईल.-संजय कुलकर्णी,सहशहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका