पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर आरोप केल्यानंतरच त्यांच्या जावयावर कारवाई झाली आहे. या संदर्भात पोलिसांच्या कारवाईचा वेग लक्षात घेता त्यामागे राजकीय हेतू असल्याची शंका आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.
खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टी प्रकरणी पुण्यात अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात रोहित पवार यांनी वारजे येथील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली. हे राजकीय षड्यंत्र असेल आणि ते घरापर्यंत आणले जात असेल, तर राजकारण आणि भविष्यासाठी ही बाब अत्यंत घातक आहे, असे ते म्हणाले.
‘एकनाथ खडसे भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांच्यावर सातत्याने ‘हनी ट्रॅप’संदर्भातील आरोप करत आहेत. महाजनही त्यांच्यावर प्रत्यारोप करत होते. त्यानंतर ही कारवाई झाली. या प्रकरणाचा सखोल आणि अराजकीय तपास करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पवार यांनी केली.
रोहित पवार म्हणाले, ‘या प्रकरणात पोलिसांकडे अनेक पुरावे आहेत. परंतु, व्हिडिओ हा सर्वांत महत्त्वाचा पुरावा आहे. हे प्रकरण अद्याप न्यायालयात गेले नसताना पोलिसांकडून हा व्हिडिओ माध्यमांपर्यंत पोहोचला. पोलिसांची घाईगडबड पाहता यामागे राजकीय हेतू असल्याची शंका येते. मुंबईत काही दिवसांपूर्वी पोलीस अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीच्या खिशात अमली पदार्थ टाकत त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, असा हा प्रकार नाही ना, अशी शंका येत आहे.’