पुणे : ‘भारताने दहशतवाद्यांविरुद्ध राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि इतर मोहिमांमुळे दिल्ली येथे दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणला, असा निष्कर्ष लावणे चुकीचे आहे. दिल्लीत मोठा स्फोट घडवून आणण्याचा कट होता. मात्र, गुप्तचर यंत्रणांनी तो वेळीच रोखला,’ असे प्रतिपादन रामजन्मभूमी मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी सोमवारी केले.
‘सिंघल फाउंडेशन’च्या वतीने ‘भारतात्मा वेद पुरस्कार’ दादासाहेब दरोडे सभागृहात आचार्य प्रद्युन्म महाराज यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट वैदिक विद्यार्थी पुरस्कार गौरी केदारेश्वर शर्मा यांना, आदर्श वैदिक शिक्षक पुरस्कार अनंत कृष्ण भट्ट यांना, तर उत्कृष्ट वैदिक संस्था पुरस्कार दत्तात्रय वेदविद्या गुरूकुलम (आंध्र प्रदेश) यांना प्रदान करण्यात आला. परीक्षक मोरेश्वर घैसास, ए. आर, नारायण घनपाठी, श्रीकृष्ण पुराणिक, रमेश वर्धन आणि आर. चौद्रमौली श्रौती यांचाही सन्मान करण्यात आला. या वेळी संजय सिंघल, रवींद्र मुळ्ये आदी उपस्थित होते. या सोहळ्यानंतर स्वामी गोविंददेव गिरी यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, ‘गरिबी, हे दहशतवादामागील कारण असते, असे आत्तापर्यंत सर्व सांगत होते. पण, दहशतवाद द्वेषातून जन्मतो, हे या हल्ल्यातील सहभागी डाॅक्टरांवरून अधोरेखित झाले आहे. देशाच्या सीमा सुरक्षित नसून आपला देश दहशतवादी हल्ल्यांच्या सावटाखाली असल्याची स्थिती कायम आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविष्यातील संकटांचा सामना ओळखून कामांचे विभाजन करावे, इतर लोकांवर जबाबदारी सोपवावी.’
ते म्हणाले, ‘या हल्ल्यात डाॅक्टरांचा सहभाग असून, शिक्षित वर्ग शांत बसला आहे. यावरून हे खूप मोठे षड्यंत्र असल्याचे भासते. हल्ल्यातील सहभागी असणाऱ्यांना डाॅक्टर कोणी बनवले, त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालये कोणी स्थापन केली, संमती कोणी दिली, महाविद्यालयांमध्ये काय चालले होते, याचा वेळोवेळी तपास का झाला नाही, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. असे पुन्हा घडणार नाही, यासाठी सुरक्षा विभाग, गुप्तचर यंत्रणांनी दक्ष राहावे.’
‘गुप्तचर यंत्रणेतील कोणी सहभागी?’
स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले, ‘या हल्ल्याच्या खोलापर्यंत जाण्यासाठी तपास यंत्रणांनी प्रभावी होण्याची गरज आहे. किंबहुना या हल्ल्यामध्ये गुप्तचर यंत्रणेतीलच कोणी सहभागी आहे किंवा नाही याचाही तपास होणे महत्त्वाचे आहे.’
