पुणे : राज्यात उष्माघाताची रुग्णसंख्या शंभराहून अधिक झाली आहे. नागपूरमध्ये उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण असून, पुण्यातही एका रुग्णाची नोंद झाली आहे. राज्यात १ मार्च ते ६ मे या कालावधीत उष्माघाताचे ११२ रुग्ण आढळून आले असून, त्यात यवतमाळमध्ये सर्वाधिक १९ रुग्ण आढळले आहेत. त्या खालोखाल बुलडाणा १५, नागपूर १०, जालना ८, धुळे, परभणी, पालघर प्रत्येकी ६, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली प्रत्येकी ५, रायगड ४, अमरावती, लातूर प्रत्येकी ३, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, वर्धा, वाशिम, कोल्हापूर प्रत्येकी २, धाराशिव, पुणे, सांगली, सातारा आणि ठाणे प्रत्येकी १ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात अद्याप उष्माघातामुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
मूत्रमार्गाच्या संसर्गामध्ये वाढ
उन्हाळ्यात मूत्रमार्गाच्या समस्या वाढतात. सर्वसाधारपणे ३५ ते ५० वयोगटातील प्रौढांमध्ये मूत्रमार्गाच्या संसर्गाचे प्रमाण जास्त दिसून येते. अतिउष्णता, शरीरातील पाणी कमी होणे आणि तापमानात होणारा चढउतार हे यासाठी कारणीभूत ठरतात. मूत्रमार्गाचा संसर्ग हा मूत्रपिंड, मूत्रमार्ग, मूत्राशयासह मूत्रमार्गाच्या कोणत्याही भागात दिसून येतो. लघवी करताना जळजळ होणे, लघवीमध्ये फेस किंवा दुर्गंधीयुक्त लघवी, वारंवार लघवी करण्याची इच्छा होणे, लघवीत रक्त येणे, ताप येणे आणि ओटीपोटात वेदना होणे ही याची लक्षणे आहेत. यावर वेळेवर उपचार न केल्यास मूत्रपिंड संसर्ग होऊ शकतो. वेळीच निदान आणि उपचार केल्यास या संसर्गाचे व्यवस्थापन करण्यास मदत होते.
उलट्या, जुलाबाचे रुग्ण अधिक
उन्हामुळे नागरिकांचा ओढा थंड पदार्थांकडे अधिक असतो. रस्त्याच्या कडेला सरबत अथवा शीतपेय विक्री करणाऱ्यांकडे यामुळे गर्दी दिसून येत आहे. या शीतपेयांमध्ये वापरला जाणारा बर्फ चांगला नसेल, तर पोटाचे विकार उद्भवतात. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि घराबाहेर कामानिमित्त राहणारे नोकरदार बाहेरील खाद्यपदार्थ खातात. हे पदार्थ बनविताना स्वच्छतेची काळजी घेतली नसल्यास पोटाच्या गंभीर समस्या उद्धवतात. यामुळेच उन्हाळ्यात उलट्या आणि जुलाबाचे रुग्ण शहरात वाढल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. याचबरोबर दूषित पाणी आणि दूषित अन्नामुळे काविळीचे रुग्णही वाढले आहेत.
उन्हाळ्यात आरोग्यविषयक तक्रारींमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्यावे. याचबरोबर बाहेरील खाद्यपदार्थ आणि शीतपेयांमुळे पोटाचे विकार जास्त प्रमाणात उद्भवतात. त्यामुळे ते खाणे टाळावे. याचबरोबर उन्हात बाहेर पडताना त्वचेवर सनस्क्रीन लावावे.डॉ. अविनाश भोंडवे, आरोग्यतज्ज्ञ
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका वाढतो. यासाठी कारणीभूत ठरणारा ई-कोलाय आतड्यांमध्ये आढळतो. तो मूत्रमार्गात गेल्यास संसर्गास कारणीभूत ठरू शकतो. हा संसर्ग टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, वेळच्या वेळी लघवी करणे, लघवी रोखून न ठेवणे, मूत्राशयावर परिणाम करणारे कॅफीन आणि अल्कोहोलचे सेवन कमी करणे गरजेचे आहे. डॉ. पवन रहांगडाले, मूत्रविकारतज्ज्ञ