पिंपरी : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपची महायुती झाली आहे. पहिले अडीच वर्ष नगराध्यक्ष पद भाजपकडे आणि दुसऱ्या अडीच वर्षात नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार असल्याचे आमदार सुनील शेळके, भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी सोमवारी सांगितले. नगरसेवक पदाच्या जागा वाटपाचे सूत्र वरिष्ठांची चर्चा करून दाेन दिवसात जाहीर केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीत प्रचार केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपचे संतोष दाभाडे यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे भाजपनेही हा निर्णय स्वीकारला आणि महायुतीवर शिक्कामोर्तब केले.
माजी आमदार भेगडे म्हणाले, ‘नगराध्यक्ष पदासाठी संताेष दाभाडे आणि गणेश काकडे यांच्या नावाबाबत चर्चा झाली. आमदार शेळके यांनी महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून संताेष दाभाडे यांचे नाव जाहीर केले हाेते. युतीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव आमदार शेळके यांनी दिला हाेता. वरिष्ठांशी चर्चा करून युतीचा निर्णय झाला आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी चर्चा केली जाईल’.
आमदार शेळके म्हणाले, ‘पुढील पाच वर्ष शहराच्या दृष्टीने एकत्र काम करण्यासाठी एक हात पुढे केला हाेता. त्याला भाजपने प्रतिसाद दिला. भाजपचे संताेष दाभाडे यांना अडीच वर्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश काकडे यांना अडीच वर्ष नगराध्यक्ष पद देण्याचा निर्णय झाला आहे. नगरसेवकपदांच्या जागा वाटपाबाबत अद्यापही एकमत झाले नाही. मुंबईत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसाेबत मंगळवारी बैठक हाेणार आहे. वरिष्ठ नेत्यांनी दिलेला निर्णय मान्य करून निवडणुकीला सामाेरे जाणार आहाेत. २८ नगरसेवक महायुतीचे निवडून आणले जातील.
पहिले अडीच वर्षे भाजपचे संताेष दाभाडे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहतील. दुसऱ्या अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश काकडे यांच्या पाठीशी महायुती ठामपणे उभी राहील. शक्य तिथे महायुतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. वडगाव नगरपंचायत बिनविराेध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोणावळ्यातही त्याच पद्धतीने विचार करत आहाेत. वडगाव आणि लाेणावळ्यामध्ये सगळे उमेदवार जाहीर केले नाहीत. त्यामुळे निर्णय घेण्यास संधी आहे’, असेही त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीलाही सोबत घेण्याचा प्रयत्न
तळेगावातील १४ प्रभागामधून २८ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. ज्या प्रभागात महाविकास आघाडीची ताकद आहे, अशा प्रभागात पदाधिकाऱ्यांना कशा पद्धतीने सामावून घेता याबाबत चर्चा केली जाईल. एक-दाेन जागा त्यांना दिल्या जातील. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.
१४ प्रभाग २८ नगरसेवक
तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत १४ प्रभाग असून २८ नगरसेवक असणार आहेत. एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. ६४ हजार ६७८ मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार ३३ हजार ३०१, महिला मतदार ३१ हजार ३७५ आणि इतर मतदार दोन आहेत.
