पुणे : राज्यातील ६३१ एसटी बस स्थानकांमध्ये ११२ कोटी रुपये खर्च करून कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित सहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या यंत्रणेचा केंद्रीय नियंत्रण आणि निरीक्षण कक्ष मुंबईतील मुख्यालयात उभारला जाणार असून, तेथून राज्यातील एसटी स्थानकांमधील गैरप्रकारांवर नजर ठेवली जाईल. ही यंत्रणा बसविण्यासाठी ‘टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट्स इंडिया लि.’ (टीसीआयएल) या निमसरकारी कंपनीला काम देण्यात आले आहे.

एसटी महामंडळाच्या विभागीय सुरक्षा तथा दक्षता समितीने प्रत्येक एसटी स्थानकावर पाहणी करून सीसीटीव्हीची ठिकाणे आणि संख्या निश्चित करून तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मार्च २०२६ पर्यंत सर्व स्थानकांमध्ये सीसीटीव्ही बसवून मुख्यालयाच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष सुरू करण्याचे उद्दिष्ट कंपनीला देण्यात आले आहे.

स्वारगेट बस स्थानकात महिला अत्याचाराची घटना घडल्यानंतर राज्यभरातील सर्वच स्थानकांमधील विशेषत: महिला प्रवाशांचा सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला. राज्यभरातील एसटी स्थानकांमध्ये २०१६ मध्ये बसविण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणेची कालमर्यादा पाच वर्षांपुरतीच होती. ही यंत्रणा २०२१ मध्येच कालबाह्य झाली असताना दोन वर्षांची (२०२३ पर्यंत) मुदतवाढ देण्यात आली. मात्र, त्यानंतर सीसीटीव्हीमधील अस्पष्ट चित्रीकरण, तांत्रिक बिघाड, देखभाल-दुरुस्ती वारंवार करावी लागत होती. बहुतांश ठिकाणी सीसीटीव्ही असूनही चित्रीकरणाची साठवणूक होत नसल्याने दुरुस्तीसाठी खासगी कंपनीच्या अभियंते आणि कामगारांकडून नकार देण्यात येत होता. त्यामुळे ही सदोष यंत्रणा काढून टाकून, अद्ययावत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

सद्य:स्थितीत राज्यभरातील सुमारे ५०० एसटी स्थानकांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहेत. मात्र, अद्यापपर्यंत या यंत्रणेच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष नव्हता. स्थानकांवरच चित्रीकरणाची माहिती साठवली जात असल्याने याकडे दुर्लक्ष होत होते. स्थानकांवर अतिरिक्त मनुष्यबळ आणि वारंवार निर्माण होणारा देखभाल-दुरुस्ती खर्चही मोठ्या प्रमाणात होता. स्थानकामध्ये काही अनुचित घटना घडल्यास पुन्हा मागोवा, पडताळणी, तपासणी आदी प्रक्रियेत विलंब होत असे. आता एकाच ठिकाणावरून राज्यभरातील एसटी स्थानकांवर नियंत्रण ठेवता येणार आहे. तसेच, चित्रीकरणाचा ‘विदा’ सुरक्षित साठवला जाईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे एसटी महामंडळाच्या मुख्यालयातून राज्यातील स्थानकांवर देखरेख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता वाढणार आहेत. तसेच गैरप्रकारांनाही आळा बसेल. – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

अशी आहे योजना

  • बस स्थानकांची संख्या : ६३१
  • सीसीटीव्ही संख्या : सुमारे ६०००
  • अपेक्षित खर्च : ११२ कोटी
  • काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट : मार्च २०२६ पर्यंत