केंद्राच्या नियमाप्रमाणे धोरणात्मक बदल
केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीईटी) बदल करण्यात येणार आहेत. त्यानुसार काही धोरणात्मक सुधारणा करण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेने केंद्र शासनाला पाठवलेल्या पत्राला मान्यता मिळाल्यानंतरच टीईटी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत टीईटी लांबणीवर पडली असून, आता ही परीक्षा मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे.
प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत शिक्षक होण्यासाठी टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. वर्षांतून दोन वेळा परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येऊनही आतापर्यंत वर्षांतून एकदाच ही परीक्षा झाली आहे. राज्य परीक्षा परिषदेने आतापर्यंत पाच टीईटी घेतल्या आहेत. त्यात २०१३, २०१४ मध्ये परीक्षा झाली. २०१५ची परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्याने रद्द करावी लागली. रद्द केलेली परीक्षा जून २०१६ मध्ये झाली. त्यानंतर २०१७, २०१८च्या जुलैमध्ये परीक्षा झाली. २०१८ मध्ये १५ जुलैला परीक्षा झाल्यानंतर २०१९ मध्ये सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन होते. मात्र, सप्टेंबरमध्ये परीक्षा होऊ शकली नाही.
आता या परीक्षेच्या स्वरूपात काही बदल करण्यात येणार आहेत. हे बदल परीक्षा परिषदेने केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठवले आहेत. या बदलांना मान्यता मिळाल्यानंतर परीक्षा घेतली जाईल. परीक्षा घेण्यापूर्वी परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यापासून बैठक व्यवस्था करण्यापर्यंत दोन महिने तयारीत जातात. फेब्रुवारी-मार्चमध्ये बारावी आणि दहावीच्या परीक्षा असल्याने परीक्षेसाठी शाळा उपलब्ध
होणार नाहीत. त्यामुळे दहावीची परीक्षा झाल्यानंतरच मार्चमध्ये टीईटी घेता येईल.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार टीईटीमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या सुधारणा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. त्यांना मंजुरी मिळाल्यानंतर वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. मार्चमध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे. – दत्तात्रय जगताप, अध्यक्ष, राज्य परीक्षा परिषद
