चंद्रकांत पाटील यांची सूचना; बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत बैठक

पुणे : शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे विकास अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करणे आवश्यक आहे. त्यामध्येच बालगंधर्व नाटय़गृहाचा पुनर्विकास आवश्यक आहे. मात्र महापालिका प्रशासनाने विरोधाचे कारण लक्षात घेऊन खासगी नाटय़गृह चालकांशी चर्चा करून तोडगा काढावा, अशी सूचना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.

 बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी घेतला. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, आशुतोष वैशंपायन यांच्यासह चित्रपट आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पुनर्विकास प्रकल्पाचे सादरीकरण या वेळी करण्यात आले.

 अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सर्वाना उत्तम सुविधा पुरविणे काळाची गरज आहे. त्यासाठी नदीसुधार प्रकल्प असो किंवा बालगंधर्व नाटय़गृहाचा पुनर्विकास प्रकल्प असो तो योग्य पद्धतीने आणि नियोजित वेळेत साकारणे महत्त्वाचे आहे. बालगंधर्व नाटय़गृहाचा पुनर्विकास अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येणार असल्यामुळे, शहराच्या सौंदर्यात भरच पडणार आहे. पुनर्विकासात नाटय़ संस्कृतीच्या जोपासनेसह, नव्या पिढीमध्ये मराठी नाटय़ क्षेत्राबद्दल ओढ निर्माण व्हावी, यासाठीचे सर्वप्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पुनर्विकास प्रकल्पात जागेचा व्यवसायिक कारणांसाठी वापर होणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नव्या नाटय़गृहाच्या पुनर्विकासात एक हजार, पाचशे आणि तीनशे आसन क्षमतेची नाटय़गृहे उभारण्यात येणार असल्यामुळे वेगवेगळय़ा कार्यक्रमांसाठी नाटय़गृह उपलब्ध होईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.   सध्या पुनर्विकासासाठी जो विरोध होत आहे, त्यामध्ये प्रामुख्याने पुनर्विकासाच्या दोन वर्षांच्या कालावधीत नाटय़रसिकांना आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कलाकारांना, नाटय़गृहापासून वंचित राहावे लागणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील इतर खासगी नाटय़गृह चालकांशी चर्चा करून, यावर तोडगा काढावा आणि किमान पुनर्विकासाचे काम पूर्ण होईपर्यंत अत्यल्प दरात महापालिकेसह खासगी नाटय़गृहे नाटय़रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी केली.