रात्र आणि दिवसाचे तापमान सरासरीखाली
पुणे : पुणे शहर आणि परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानातील चढ-उतार कायम आहे. सध्या आकाश मुख्यत: निरभ्र राहात असल्याने रात्रीच्या तापमानात घट झाली असून, शनिवारी ते सरासरीच्या खाली आले होते. त्यामुळे हवेत गारवा जाणवत होता. दिवसाच्या कमाल तापमानात मात्र काही प्रमाणात वाढ झाली असली, तरी अद्याप तेही सरासरीखालीच असल्याने उन्हाचा चटका जाणवत नाही. पुढील पाच दिवस हे तापमान कायम राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह सध्या वाढले आहेत. त्यातच पूर्वेकडील बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे बाष्पाचा पुरवठा वाढला आहे. त्यामुळे विदर्भापासून रायलसिमादरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होऊन पावसास या भागांत पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम राज्याच्या इतर भागावरही होतो आहे. पुणे शहरामध्ये सध्या आकाश निरभ्र असले, तरी दोन दिवसांनी ढगाळ स्थिती होणार आहे. त्यामुळे सध्याच्या तापमानात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.
पुणे आणि परिसरात सध्या तरी रात्रीच्या तापमानाचा पारा घसरलेला आहे. शुक्रवारी १६.२ अंशांवर असलेले तापमान शनिवारी पहाटे १४.६ अंशांपर्यंत खाली आले. परिणामी गारवा जाणवू लागला. निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे रात्र थंड असली, तरी दिवसाच्या तापमानात मात्र वाढ झाली. शुक्रवारी २९.८ अंशांपर्यंत खाली आलेले कमाल तापमान शनिवारी ३१.८ अंशांवर पोहोचले असले, तरी सरासरीच्या तुलनेत २.९ अंशांनी कमी होते. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार ९ मार्चनंतर शहरातील आकाशाची स्थिती अंशत: ढगाळ होणार आहे. त्यामुळे रात्रीच्या किमान तापमानात वाढ होऊन ते पुन्हा १६ ते १७ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. दिवसाचे कमाल तापमान ३२ ते ३३ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.