कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे राज्याच्या बहुतांश भागात सध्या पावसाळी आणि वादळी स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबरीने अनेक भागांत तापमानातील वाढही कायम आहे. त्यामुळे काही भागांत उकाडाही वाढला आहे. पुढील दोन दिवस कोकण विभागासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भात ६ मेपर्यंत पाऊस बरसणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशापासून तमिळनाडूपर्यंत सध्या हवेची द्रोणीय स्थिती आहे. अंदमानच्या समुद्रापासून दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. वातावरणाच्या या स्थितीमुळे राज्यात सध्या पावसाळी स्थिती आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली. गेल्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला. पुणे शहरामध्ये शुक्रवारी (१ मे) वादळी पावसाने तडाखा दिला.

पावसाळी स्थितीबरोबरच सध्या दिवसाचे कमाल आणि रात्रीच्या किमान तापमानात वाढ नोंदविली जात आहे. प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भामध्ये तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रातही दिवसा आणि रात्रीचे तापमान सरासरीच्या पुढे आहे. मुंबई, रत्नागिरीसह कोकणातील इतर विभागांत रात्रीच्या किमान तापमानात मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याने रात्रीच्या उकाडय़ात कमालीची वाढ झाली आहे.

पारा ४४ अंशांवर

मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागातील दिवसाचे कमाल तापमान सरासरीपेक्षा १ ते २ अंशांनी अधिक आहे. मात्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा वाढून तो ४३ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे. शनिवारी (२ मे)  अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परभणी, नांदेड, अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा आदी भागातील तापमानही ४३ ते ४४ अंशांच्या आसपास आहे.