कवाडेवाडी (ता. कोरेगाव) येथे १० गावठी बॉम्ब सापडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याची माहिती मिळाल्यानंतर सातारा पोलीस दलातील बॉम्ब शोधक पथक व श्वान पथकाने (डॉग स्कॉड) हे सर्व बॉम्ब निकामी केले. हे सर्व गावठी बॉम्ब असून, शिकारीसाठी व जंगली प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी वापरले जातात.

रविवारी सकाळी कवाडेवाडी येथे बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेने पोलिसांनी घटनेच गांभीर्य ओळखत तत्काळ बॉम्ब शोधक पथकासह डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत डोंगरावर पोलिसांची शोध मोहिम सुरु झाली. सकाळी सुरु झालेले ही शोध मोहीम दुपारपर्यंत सुरु होती. कवाडेवाडी गावच्या हद्दीत बॉम्ब असल्याची माहिती पसरल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच बघ्यांची गर्दीही उसळली होती.

सुमारे चार तासांहून अधिक काळ बॉम्ब शोधण्याची मोहीम राबवल्यानंतर प्राथमिक माहितीनुसार १० हून अधिक बॉम्ब पोलिसांना सापडले. सातारा पोलीस दलाने सर्व गावठी बॉम्ब शोधून काढल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पोलिसांकडून दुपारपर्यंत घटनास्थळाचा पंचनामा सुरु होता. सर्व घटनेची माहिती घेवून संशयितांचा शोध घेण्याची कारवाई सुरू करण्यात आली.