वारजे जलशुद्धीकरण केंद्र चालवायला देण्यासाठी आठ कोटी रुपयांची जी निविदा मंजूर करण्यात आली त्या प्रक्रियेत अनेक बेकायदेशीर बाबी घडल्याचे उघड झाल्यानंतर आता ही निविदा अडचणीत आली आहे. मंजूर झालेल्या या विषयाचा फेरविचार करावा, असे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक अॅड. किशोर शिंदे यांनी दिले आहे. दरम्यान, संबंधित कंपनीला काम देऊ नये, असे पत्र नगरसेवक सचिन दोडके यांनी जानेवारी माहिन्यातच प्रशासनाला दिले होते, ही बाबही आता समोर आली आहे. 
वारजे जलशुद्धीकरण केंद्र चालवणे आणि पुढील तीन वर्षांसाठी देखभाल-दुरुस्ती करणे या कामाची आठ कोटींची निविदा स्थायी समितीत घाईगडबडीने मंजूर करण्यात आली असून ही प्रक्रिया राबवताना अनेक बाबी नियमबाह्य़ पद्धतीने झाल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे. स्थायी समितीत मंजूर झालेल्या या विषयाचा समितीने फेरविचार करावा, असे पत्र नगरसेवक किशोर शिंदे यांनी दिले आहे. शिंदे यांनी फेरविचार दिल्यामुळे हा निविदा मंजुरीचा विषय पुन्हा स्थायी समितीपुढे मांडावा लागेल. त्यावेळी होणाऱ्या चर्चेत निविदा प्रक्रियेत कोणत्या बाबी नियमबाह्य़ होत्या याची चर्चा होईल.
हे काम चेन्नईच्या कंपनीला देण्यात आले असून संबंधित कंपनीने पुण्यात यापूर्वीची कामे समाधानकारकरीतीने केलेली नसल्यामुळे कंपनीला वारजे जलकेंद्राचे काम देऊ नये, असे पत्र स्थानिक नगरसेवक सचिन दोडके यांनी २३ जानेवारी रोजी संबंधित विभागाला दिले होते. मात्र, त्यानंतरही संबंधित कंपनीलाच हे काम देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेतील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने देखील कंपनीला काम न देण्याबाबत पत्र दिले होते. मात्र, त्या पत्राकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे.