जेजुरी : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळासाठी जमिनीचे ड्रोन सर्वेक्षण करण्यासाठी एखतपूर येथे गेलेल्या अधिकारी व पोलिसांबरोबर आंदोलकांची धुमश्चक्री झाली होती. या पार्श्वभूमीवर विमानतळासाठी भूसंपादन होणाऱ्या गावांमध्ये रविवारी तणावपूर्ण शांततेचे वातावरण होते. दरम्यान, आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये प्रस्तावित विमानतळासाठी जमिनीचे ड्रोन सर्वेक्षण करण्याचे काम शासकीय यंत्रणांनी सुरू केले होते. यासाठी एखतपूर येथे शनिवारी अधिकारी व पोलीस गेले होते. त्यावेळी आंदोलकांनी शासकीय अधिकाऱ्यांचा रस्ता अडविला. यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री झाली. पोलिसांच्या गाड्यांवर आंदोलकांनी दगडफेक केली. पोलिसांनी अश्रूधुराचा मारा करून आंदोलकांवर लाठीमार केला. या लाठीमारामध्ये काही शेतकरी जखमी झाले तर, दगडफेकीत ३ पोलीस अधिकारी व १३ पोलीस अंमलदार जखमी झाले.

सासवड पोलिसांनी चार आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. त्यामुळे सासवड पोलीस ठाण्याच्या आवारात शनिवारी रात्री उशिरापर्यंत शेतकरी आंदोलकांनी ठिय्या मांडला होता. अटक केलेल्या आंदोलकांना सोडा, अशी त्यांची मागणी होती. पोलिसांनी अटक केलेल्या आंदोलकांची न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केली. याचबरोबर २५० ते ३०० अज्ञात व्यक्तींवर गुन्हे दाखल केल्याने विमानतळासाठी भूसंपादन होणाऱ्या सात गावांमध्ये तणावाचे वातावरण आहे. पोलीस दडपशाही करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

पोलीस चित्रीकरण तपासणार

सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल अडीचशे ते तीनशे अज्ञात आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी दिली. ते म्हणाले, ‘एखतपूर येथे झालेल्या आंदोलनामध्ये सरकारी कामात अडथळा आणणे, जिवे मारण्यासाठी बैलगाडी अंगावर सोडणे, दगडफेक करणे, किरकोळ जखमी करणे या प्रकरणी अडीचशे ते तीनशे अज्ञात आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनाच्या वेळी चित्रीकरण करण्यात आलेले आहे. चित्रीकरण तपासून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.’