पुण्यातील धायरी भागात राहणार्‍या पती, पत्नीचा काही महिन्यापुर्वी प्रेम विवाह झाला होता. दोघांचा संसार सुरळीत होता. दरम्यान, नवविवाहितेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर तिचा पती फरार झाला आहे. निशा अजय निकाळजे (वय १९), असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती अजय निकाळजे (वय २१ रा. धायरी) हा पसार झाला आहे.

सिंहगड पोलीस स्टेशनचे निरीक्षक देवीदास घेवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय आणि निशा यांचा काही महिन्यापूर्वी प्रेमविवाह झाला होता. दोघे सुरुवातीला जनता वसाहत येथे राहण्यास होते. मात्र तेथून वडगाव धायरी येथे राहण्यास आले. त्या दोघांचा संसार सुरळीत सुरू होता. पण निशाला मोबाईलवर बोलण्याची सवय होती. त्यावरून तू मोबाईलवर कोणाशी बोलत असतेस, असे म्हणून सातत्याने तिच्या सोबत अजय भांडण करायचा. अशीच भांडण शुक्रवारी रात्री देखील झाली. त्यातून तिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप मयत निशाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या घटनेनंतर तिचा पती अजय हा पसार झाला आहे. त्याचा शोध आम्ही घेत असून मयत निशा हिचा शवविच्छेदन अहवाल आल्यावरच सांगता येईल की, खून झाला की, अन्य कोणत्या कारणाने मृत्यू झाला आहे.