पुणे : राज्यातील २० शहरांतून आलेल्या १ हजार १८८ कथक नृत्यांगनांनी एकत्र सादर केलेल्या नृत्याची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’मध्ये झाली आहे. प्रेरणा फाउंडेशनच्या ‘नृत्य चक्र’ या नृत्यसमूहाने आयोजित केलेल्या उपक्रमाद्वारे एकाच वेळी सर्वाधिक नृत्यांगनांनी कथक नृत्य सादर करण्याचा विश्वविक्रम यातून नोंदवला गेला.

ज्योती मनसुखानी यांच्या संकल्पनेतून विविध गटांच्या १ हजार १८८ नृत्यांगनांनी एकत्र येत २० मिनिटांसाठी नृत्य सादरीकरण केले. संयोजन समितीमध्ये तेजस्विनी साठे, अस्मिता ठाकूर, रसिका गुमास्ते आणि डॉ. माधुरी आपटे यांचा समावेश होता. कथक नृत्य सादरीकरणाचा हा उपक्रम महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाच्या मैदानावर झाला होता. कथक नृत्यांगनांनी एकाच वेळी सादर केलेल्या सर्वाधिक रचनांसाठी ही नोंद झाली. गेल्या वर्षी २५ फेब्रुवारी रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, नोंदीचे प्रमाणपत्र १ मे रोजी मिळाले.