मूकबधिर तरुणांचे आपल्या विविध मागण्यांसाठी पुण्यातल्या समाजकल्याण आयुक्तालयावर सुरु असलेले ठिय्या उपोषण आज (दि. २६) ३१ तासानंतर अखेर मागे घेण्यात आले. राज्य शासनाकडून त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे समाजीक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची शिष्टाई यशस्वी झाली आहे. आंदोलनकर्त्यांना त्यांच्या हस्ते ज्यूस पाजून हे उपोषण मागे घेण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारपासून सुरु असलेल्या या आंदोलनादरम्यान मूकबधिर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या घटनेचा राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात होता. दरम्यान, गेल्या २३ तासांपासून मूकबधिर तरुण उपाशीपोटी आंदोलन करीत होते. सरकारने आता चर्चा न करता थेट जीआरच काढावा असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता.

दरम्यान, सरकारवर सर्वस्तरातून टीका होत असताना मंगळवारी पहाटेच्या सुमारास सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. पण या दरम्यान, मूकबधिर तरुणांशी सांकेतिक भाषेत बोलण्यासाठी कोणी नसल्याने संवाद साधला गेला नाही. मात्र, त्यानंतर ही चर्चा यशस्वी पार पडली आणि या तरुणांच्या मागण्या मान्य करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.

सोमवारी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये ३३ जण जखमी झाले होते. मागील २३ तासांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांची भेट घेतली. आंदोलकांशी चर्चा करून त्यांनी सरकारवर निशाणाही साधला.

शीख समाजाकडून मूकबधिर आंदोलनकर्त्याना अन्नदान

मूकबधिर तरुणांच्या उपोषणाला ३१ तासाचा कालावधी उलटून गेला होता तोपर्यंत ते उपाशीच होते. हे लक्षात घेता पुणे कॅम्प गुरूद्वाराकडून पुलाव, जिलेबी आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या त्यांच्यासाठी आणले होते. पण आंदोलनकर्त्याकडून जोवर सरकार निर्णय घेत नाही. तोवर आम्ही जेवण करणार नाही. अशी ठाम भूमिका पुणे कॅम्प गुरूद्वाराच्या स्वयंसेवकाकडे मांडली. त्यानंतर काही वेळाने सरकारने मूकबधिर तरुणाच्या मागण्या मान्य केल्यानंतर पुलाव, जिलेबी आणि पाण्याची बॉटलचे वाटप करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The demands of the deaf youth are acceptable the fasting stop
First published on: 26-02-2019 at 16:39 IST