राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. पाचवीचे १ लाख १३ हजार ९३८ विद्यार्थी (२२.१६ टक्के), आठवीचे ५५ हजार ५५७ (१५.६० टक्के) विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.

राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे निकालाची माहिती दिली. १२ फेब्रुवारीला राज्यभरात शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. पाचवीच्या ५ लाख ३२ हजार ८७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या ५ लाख १४ हजार १३१ विद्यार्थ्यांपैकी १ लाख १३ हजार ९३८ विद्यार्थी पात्र ठरले. तर आठवीच्या ३ लाख ६७ हजार ८०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या लाख ५६ हजार ३२ विद्यार्थ्यांपैकी ५५ हजार ५५७ विद्यार्थी पात्र ठरले.

हेही वाचा >>>अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणात शिक्षकाला १५ वर्षे सक्तमजुरी

अंतरिम निकाल http://www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्याचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल. विद्यार्थ्यांना ९ मेपर्यंत गुणपडताळणीसाठी अर्ज करता येईल. गुणपडताळणीसाठी प्रत्येक पेपरसाठी ५० रुपये शुल्क आहे. मुदतीनंतरच्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी-ग्रामीण, अभ्यासक्रम आदी दुरूस्तीसाठीही ९ मेपर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे शिष्यवृत्ती परीक्षांचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. मात्र यंदा ते पूर्वपदावर आले. तसेच पहिल्यांदाच एप्रिलमध्ये निकाल जाहीर करण्यात आला, असे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष महेश पालकर यांनी सांगितले.