पुणे : वाहतूक कोंडीच्या गर्तेत अडकलेल्या सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या एका खांबाचे (पिलर) नियोजन चुकल्याचे गुणवत्ता तपासणी निकषातून पुढे आले आहे. त्यामुळे संतोष हाॅल परिसरातील उड्डाणपुलाच्या एका खांबाचा काही भाग पाडण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर आली आहे. यापूर्वी मेट्रो मार्गिकेचे खांब निकषाप्रमाणे नसल्याचे पुढे आल्यानंतर महापालिकेचे नियोजनही चुकल्याचे स्पष्ट झाले आहे.यापूर्वी प्रस्तावित मेट्रो मार्गिकेसाठी उड्डाणपुलाच्या कामाचा आराखडा बदलण्याची वेळ महापालिकेवर आली होती. त्यानंतर आता सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या खांबाचा आराखडा बदलावा लागला आहे. त्यामुळे खर्च वाया गेला असून, पुढील काही दिवस वाहनचालकांना कोंडी सहन करावी लागणार आहे.
सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने राजाराम पूल ते फनटाइन या दरम्यान उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. उड्डाणपुलाचे आतापर्यंत ५० टक्के काम पूर्ण झाले असून, पुढील वर्षाअखेरपर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.उड्डाणपुलासाठी गोयल गंगा ते संतोष हाॅल या दरम्यान दहा खांब उभारणीसह गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, संतोष हाॅल ते विठ्ठलवाडी या दरम्यान खांब उभारण्यात आले आहेत. या दहा खांबांच्या कामाच्या गुणवत्तेची तपासणी महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली. त्यावेळी संतोष हाॅल चाैकातील खांबाचे काम सदोष असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आढळून आले. संतोष हॉल चौकातील खांबाच्या कामाची गुणवत्ता ‘एम-३०’ एवढी दिसून आली. त्यामुळे तीन मीटर अंतराचा भाग पाडण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर आली.
हेही वाचा >>>पुणे: संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद
मेट्रो मार्गिकेसाठी आराखड्यात बदल
सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यास विलंब झाला. सध्या उड्डाणपुलाच्या कामामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी उड्डाणपुलाची कामे सुरू करण्यात आल्यानंतर प्रस्तावित मेट्रो मार्गिकेचा विचार करण्यात आला नसल्याचे पुढे आले होते. त्यामुळे काम सुरू करण्यापूर्वी पुन्हा आराखडा करावा लागला. त्यानुसार उड्डाणपुलाच्या मार्गात मेट्रोच्या खाबांसाठी काही जागा ठेवण्यात आली आहे.
हेही वाचा >>>स्वतंत्र कार्यालयापेक्षा ‘को-वर्किंग स्पेस’ला पसंती; देशात पुणे आघाडीवर
दररोज सव्वा लाख वाहनांची ये-जा
या रस्त्यावरून दररोज १ लाख २५ हजार वाहने ये-जा करतात, असे सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चार पर्यायी नकाशे तयार करण्यात आले होते. त्यापैकी स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी राजाराम पूल चौकात ४९५ मीटर लांबीचा आणि सिंहगडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृहापर्यंत २ हजार १२० मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. दुहेरी वाहतुकीसाठी पुलाची रुंदी १६.३ मीटर आणि एकेरी वाहतुकीसाठी पुलाची रुंदी ८.१५० मीटर एवढी आहे. उड्डाणपुलामुळे २.७४ किलोमीटर अंतराची वाहतूक थेट होणार आहे.
गुणवत्ता तपासणीत खांबाचा तीन मीटर अंतराचा भाग चुकल्याचे आढळून आले. त्यामुळे तो भाग तोडून नव्याने काम सुरू करण्यात आले आहे. त्याचा आर्थिक फटका महापालिकेला बसणार नाही. ठेकेदाराकडून ते काम केले जाणार आहे.- अजय वायसे, कार्यकारी अभियंता, पुणे महापालिका