पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हे शाखा युनिट दोनने जिवंत काडतुसे आणि गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. जिशान शब्बीर खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडे दोन जिवंत काडतुसे आणि गावठी पिस्तूल आढळले. अद्याप जिशानने पिस्तूल बाळगण्याचं कारण समोर आलेले नाही. त्याचा तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक विभागाकडून कारवाईचा दंडुका
हेही वाचा – नेपाळमध्ये भूकंप; पुण्यातील ३९ पर्यटक सुरक्षित
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी जमीर तांबोळी, संतोष इंगळे हे रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करत असताना महादेव नगर चिखली या ठिकाणी जिशान हा गावठी पिस्तूल कमरेला लावून उभा होता अशी माहिती मिळाली. त्यानंतर, तांबोळी, इंगळे, अवसरे आणि कापसे यांनी सापळा रचून जिशानला ताब्यात घेतलं, त्याची अंगझडती घेतली. त्याच्याकडे दोन जिवंत काडतुसे आणि गावठी पिस्तूल आढळले आहे. जिशानने पिस्तूल आणि जिवंत काडतुसे उत्तर प्रदेश या ठिकाणाहून आणली होती. अद्याप एक पिस्तूल आणि जिवंत काडतुसे का आणली याचा तपास पोलीस करत आहेत. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.