पुणे : ‘पुरुषांचे वर्चस्व असलेली ही अकादमी मुलींच्या प्रवेशाने एकात्मिक झाली. हा ऐतिहासिक बदल प्रथमत: आमच्या तुकडीने अनुभवला,’ अशी प्रातिनिधिक भावना कॅप्टन प्रिन्सकुमार कुशवाह या छात्राने व्यक्त केली. मूळचा उत्तर प्रदेशातील मथुरा येथील प्रिन्सकुमारने संगणकशास्त्र शाखेत पहिला क्रमांक पटकावला. ‘एनडीए’मधील तीन वर्षे ही खूप संस्मरणीय, आव्हानात्मक होती. या तीन वर्षांत खेळापासून नेतृत्वापर्यंत अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आमच्या तुकडीने अकादमी बदलताना पाहिली,’ अशी त्याची भावना होती.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १४८ व्या तुकडीतील विविध शाखांमध्ये अग्रस्थान मिळवलेल्या चार छात्रांपैकी तीन छात्रांना लष्करी पार्श्वभूमी आहे, तर एक छात्र शेतकरी कुटुंबातून आलेला आहे.

प्रिन्सकुमारचे वडील लालचंद कुशवाह लष्कराच्या तोफखाना विभागातून नायब सुभेदार म्हणून निवृत्त झाले आहेत. एक बहीण दंतवैद्यकीय पदवीचे शिक्षण घेत आहे, तर दुसरी बहीण लष्करात येण्यासाठी चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमीमध्ये (ओटीए) प्रशिक्षणार्थी आहे. ‘मुलगा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून सैन्य दलात दाखल होत आहे, हा अविस्मरणीय प्रसंग आहे.

एनडीएच्या १४८व्या तुकडीतील ३३९ छात्रांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. त्यात ८४ छात्रांना विज्ञान शाखेची, ८५ छात्रांना संगणकशास्त्र, ५९ छात्रांना कला शाखेची, तर १११ छात्रांना बी. टेक. पदवी देण्यात आली. याच कार्यक्रमात विविध शाखांमध्ये अग्रस्थान पटकाविलेल्या छात्रांना गौरविण्यात आले.

कला शाखेत पहिली आलेल्या कॅप्टन श्रिती दक्षचे वडील योगेशकुमार दक्ष हवाई दलातून विंग कमांडर म्हणून निवृत्त झाले आहेत. ते म्हणाले, ‘माझी धाकटी मुलगीही सैन्यात दाखल होत असल्याचा आनंद आहे. मी ज्या स्क्वाड्रनमध्ये ३० वर्षांपूर्वी होतो, त्याच स्क्वाड्रनचा तीही भाग झाली आहे. तिने माझ्यापेक्षा जास्त चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे मला तिचा अभिमान वाटतो.’

विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक पटकाविलेला कॅप्टन लकीकुमार बिहारचा आहे. त्याचे वडील शेतकरी, तर आई गृहिणी आहे. त्याचा चुलतभाऊ एनडीएचा स्नातक आहे. त्याच्याकडून लकीकुमारला एनडीएमध्ये येण्याची प्रेरणा मिळाली. ‘एनडीएतील प्रशिक्षणाने संपूर्ण बदलून गेलो, असे वाटते. तीन वर्षांच्या प्रशिक्षणात अनेक खेळदेखील शिकलो. पुढे हवाई दलात जाण्याचा मानस आहे,’ अशी भावना त्याने व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॅप्टन उदयवीरसिंह नेगी याने बीटेकमध्ये अग्रस्थान मिळवले. ‘लष्करात येणारी माझी चौथी पिढी आहे. लष्करात जायचे हे निश्चित होते. ‘एनडीए’त आल्यावर मी तीन वर्षे कुटुंबाशिवाय राहू शकीन का, याबाबत साशंक होतो. मात्र, माझे कुटुंब हीच माझी प्रेरणा आहे. त्यामुळे आता मी उत्तीर्ण होणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. आता नौदलात जाण्याचा मानस आहे,’ असे त्याने सांगितले. त्याचे वडील कर्नल आदित्यसिंह नेगी म्हणाले, ‘माझा मुलगा ‘एनडीए’सारख्या प्रतिष्ठित संस्थेतून उत्तीर्ण होत असल्याचा अभिमान आहे. कुटुंबाच्या लष्करी वारशात नौदलात कोणीही नव्हते. मात्र, त्याला तांत्रिक विषय, समुद्राची आवड असल्याने त्यानेच नौदलात जाण्याचा निर्णय घेतला आहे.’