सागर कासार

करोनामुळं जगभरात लाखो निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. देशातील बहुतांश राज्यात या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. मात्र, जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात आजपर्यंत एकही करोनाचा रुग्ण आढळलेला नाही. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या जिल्ह्याचे सूक्ष्म नियोजन केल्यानेच हे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे या जिल्ह्याची जबाबदारी महाराष्ट्राचे सुपुत्र सागर डोईफोडे यांच्या खांद्यावर आहे, ते या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत.

लोकसत्ता ऑनलाइनशी संवाद साधता जिल्हाधिकारी डोईफोडे म्हणाले, “दोडा येथे जिल्हाधिकारी म्हणून मी साधारण दोन वर्षांपासून काम करीत आहे. माझ्या कार्यकाळात या भागात अनेक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या. मात्र, त्याचदरम्यान जगभरात करोना विषाणूपासून होणाऱ्या आजाराची चर्चा सुरू झाली. आपल्या देशात मार्च महिन्याच्या पाहिल्या आठवड्यात या आजाराचा रुग्ण आढळून आला. मात्र, आम्ही त्यापूर्वीच म्हणजे १ मार्चपासून आमच्या जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय सेवेत येणार्‍या कर्मचाऱ्याची बैठक घेतली. त्यामध्ये जवळपास ३ हजार जणांना करोनाबाबत प्रतिबंधात्मक उपायांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.”

“यामध्ये आपण स्वतःची स्वच्छता कशी राखली पाहिजे हे प्रथम या सर्वांना समजावून सांगण्यात आले. त्यावेळी ८ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये सुरू होती. तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना देखील हाताची स्वच्छता आणि या पुढील काळात आरोग्याची कशी काळजी घ्यायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक घरापर्यंत हा संदेश जाण्यास मदत झाली. त्यानंतर तातडीने जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व हॉटेल्स, वाहतूक देखील बंद करण्यात आली. या आजाराचा प्रसार लक्षात घेता, स्थानिक पातळीवर मास्क तयार करून प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन पोहोचविण्याचे कामही करण्यात आले. आजही हे काम सुरूच आहे.”

“दोडाच्या जिल्हा रुग्णालयामध्ये करोनाच्या रुग्णांसाठी ३०० बेडची व्यवस्था करण्यात आली तसेच १७ तालुक्यांमध्ये देखील काही प्रमाणात बेडची व्यवस्था करण्यात आली. तसेच या ठिकाणी जे डॉक्टर रुग्णांवर उपचार करतील अशा डॉक्टर्स आणि इतर स्टाफसाठी आवश्यक पीपीई किटसारखे किट तयार करुन त्याचे वाटप करण्यात आले. त्याच कालावधीत परदेशातून आणि इतर राज्यातील आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याची प्राथमिक तपासणी करून, भविष्यातील धोका लक्षात घेता ३ हजार ५०० नागरिकांना होम कॉरंटाईन राहण्याच्या सूचना केल्या गेल्या. तसेच त्यांच्या हातावर क्वारंटाइनचे शिक्केही मारण्यात आले. त्याचबरोबर जिल्ह्यामधील बहुतांश भागाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. यामुळे स्वच्छता राखण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.”

येथील नागरिकांच्या सुरुवातीच्या अनुभवाबाबत सांगताना जिल्हाधिकारी डोईफोडे म्हणाले, “ज्या वेळी जगभरात या आजाराचे रुग्ण आढळत होते. तेव्हा येथील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. अगदी सुरुवातीला त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्यात आले, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला गेला. त्यामुळे आमच्या दोडा जिल्ह्यात आजअखेर एकही करोनाचा रुग्ण आढळलेला नाही. जिल्ह्यातील ५ लाख नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले आहे. आता यापुढील काळात देखील सरकारकडून येणार्‍या आदेशाचे पालन करण्यात येणार असून आपण सर्वांनी घरी बसून या आजाराला हद्दपार करायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.

चार दिवसांपूर्वी मुलगा झाला, पण एवढ्यात भेटू शकत नाही – सागर डोईफोडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या दोन वर्षांपासून जम्मू आणि काश्मीरच्या दोडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले सागर डोईफोडे सध्या करोनाविरोधात लढणारे आघाडीचे योद्धे आहेत. यामध्ये ते यशस्वी देखील झाले आहेत. दरम्यान, त्यांच्या पत्नीने चारच दिवसांपूर्वी पुण्यात एका गोंडस मुलाला जन्म दिला. पण सध्या कर्तव्यावर व्यस्त असल्याने मुलाला कधी भेटायला जाईल हे सांगू शकत नाही अशी, खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.