महिलांनी सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे. मात्र आज ही काही महिलांना परिस्थितीशी झगडावं लागत आहे. अश्याच एका महिलेला आपल्या आर्थिक परिस्थितीशी दोन हात करावे लागत असून पोटाची खळगी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी ट्रक चालक म्हणून काम करण्याची वेळ आली आहे. प्रियंका विजय शर्मा अस या महिलेचे नाव असून त्या मूळ हरयाणा मधील यमुनानगर येथील आहेत. पतीचे आजाराने निधन झाले. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली, दोन्ही मुलांचे शिक्षण हे सर्व डोळ्या समोर दिसल्याने असा धाडसी निर्णय घेत ट्रान्सपोर्ट चालक हा व्यवसाय निवडला आणि आज त्यांनी स्वतः दोन हजार किलोमीटर अंतर पार करून १४ टायर असलेला ट्रक चाकण परिसरातील एका कंपनीत माल वाहून आणला आहे.
प्रियंका विजय शर्मा यांच्या पतीचे निधन काही वर्षांपूर्वी आजाराने झाले. पतीच्या पश्चात दोन मुलं आणि स्वतः त्या होत्या. एक मुलगा दहा आणि दुसरा सात वर्षांचा असून त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न प्रियंका यांना सतावत होता. पती गेल्यानंतर त्यांनी खासगी कंपनीत काम करण्यास सुरुवात देखील केली. मात्र, तुटपुंजा पगार मिळत असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षण भागात नव्हते. अखेर त्यांनी अत्यंत धाडसी निर्णय घेत ट्रान्सपोर्ट मधील ट्रक चालवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतलं.
त्यांच्या ओळखीतल्या एका सजग व्यक्तीने त्यांना ट्रान्सपोर्टमध्ये व्यवसाय करण्यास संधी दिली. प्रियंका या गेल्या दोन वर्षांपासून १४ टायरचा मोठा ट्रक चालवतात. लांबच्या प्रवासात त्यांना अनेक अडचणी सामोरे जावे लागत आहे. मात्र पोटाची खळगी आणि कुटुंबाच्या प्रश्न समोर येत असल्याने हे काम करव लागत असल्याचं त्यांनी सांगितले आहे. त्या आजही संघर्षमय जीवन जगत असून पती गेल्यानंतर कोणताच आधार राहिला नसल्याचे नाउमेद न होता आयुष्याच्या वाटेवर एक एक पाऊल पुढे टाकत आहेत. अवघ्या देशात सध्या नवरात्रौत्सव साजरा केला जात असून अशा दुर्गेला सर्वसामान्याने साथ आणि कौतुकाची थाप देणे गरजेचे आहे.
