पुणे: उरळी देवाची येथील मंतरवाडी कचरा डेपोसमोर झोपलेल्या वाहनचालकाचा विचित्ररित्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. दोन वाहनांच्या मध्ये झोपल्यानंतर टेम्पो पाठीमागेघेताना त्याच्या अंगावरून चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला.या अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच त्याची माहिती न देता पसार झाला. निष्काळजीपणाने हकनाक एक बळी गेल्याची हळहळ व्यक्त केली जात आहे.

गणेश ज्ञानेश्वर जाधव (वय३१, रा. सटलवाडी, ता. पुरंदर) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश यांच्या चुलत भावाने दिलेल्या तक्रारीवरून फुरसुंगी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात रविवारी (१७ ऑगस्ट) दुपारी एकच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश जाधव हे वाहतूक करणाऱ्या गाडीवर चालक म्हणून काम करत होते. ते दुपारी त्यांची गाडी घेऊन मंतरवाडी येथे आले होते. गाडी थांबवून ते दोन गाड्यांच्या मध्ये झोपले होते. त्याचवेळी तेथे असलेल्या टेम्पोचालकाने जाण्यासाठी गाडी काढण्यास सुरुवात केली. मात्र, तेथे झोपलेल्या गणेश यांना टेम्पोचालकाने पाहिले नाही. वाहन पाठीमागे घेत असताना टेम्पोचे चाक पायावरून व अंगावरून गेले आणि या दुर्दैवी अपघातामध्ये गणेश यांचा मृत्यू झाला.

अचानक मोटारचा दरवाजा उघडल्याने महिला पोलीस कर्मचाऱ्यास दुखापत

बंडगार्डन परिसरात चारचाकी वाहनचालकाने निष्काळजीपणे गाडीचा दरवाजा अचानक उघडला गेल्याने दुचाकीवरून जात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातामध्ये पोलीस महिलेच्या डाव्या हाताची दोन बोटे फॅक्चर झाली. सोमवार पेठ पोलीस वसाहत ते आंबेडकर रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाची ट्रेझरी शाखा या दरम्यानच्या रस्त्यावर १४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा संतोष करडे (वय ३८, पोलीस अंमलदार, लष्कर पोलीस ठाणे या आपल्या दुचाकीवरून जात होत्या. त्यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटारीमधील व्यक्तीने अचानक मोटारीचा दरवाजा उघडला. बेसावध असलेल्या सीमा यांच्या डाव्या हातावर हा दरवाजा जोरदारपणे आपटला गेला. या अपघातामध्ये त्यांच्या डाव्या हाताची करंगळी व त्यालगतचे बोट फ्रॅक्चर प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.