पुणे : सणासुदीच्या काळात बाजारात गोटा खोबऱ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांत खोबऱ्याच्या दरात किलोमागे १०० रुपयांनी वाढ झाली आहे. नारळी पौर्णिमा, गणेशाेत्सवाच्या काळात खोबऱ्याला मोठी मागणी राहणार असून, खोबऱ्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

श्रावण महिन्याला शुक्रवारी (२५ जुलै) सुरुवात होत आहे. श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेला खोबऱ्याला मागणी वाढते. त्यानंतर गणेशोत्सव, गौरी, नवरात्रोत्सव, दिवाळी असे सण आहेत. सणासुदीच्या काळात खोबऱ्याला मागणी दुपटी-तिपटीने वाढते. त्यामुळे यापुढील काळात खोबऱ्याला मागणी वाढणार आहे. बाजारात सध्या नारळाचा तुटवडा जाणवत आहे. मार्केट यार्डातील भुसार बाजारात एक किलो खोबऱ्याचे दर ३०० ते ३२० रुपये किलो आहेत. किरकोळ बाजारात एक किलो खोबऱ्याचे दर ४२० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. बाजारात तामिळनाडू, कर्नाटकातून खोबऱ्याची आवक होते. गेल्या दोन वर्षांपासून या दोन्ही राज्यांत नारळाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे, अशी माहिती मार्केट यार्डातील व्यापारी अशोक लोढा यांनी दिली.

दक्षिणेकडील राज्यात नारळाच्या उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे खोबऱ्याची आवक कमी प्रमाणावर होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने खोबऱ्याचे दर तेजीत आहे. पुण्यातील मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज २० ते ३० टन खोबऱ्याची आवक पूर्वी व्हायची. गेल्या काही दिवसांपासून ही आवक १५ ते २० टन होत आहे, असे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवात उच्चांकी मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रावण महिन्यानंतर गणेशोत्सवाचा प्रारंभ होता. गणेशोत्सवात मोदक, बर्फी तसेच गौरी आगमनानिमित्त केल्या जाणाऱ्या फराळांच्या पदार्थांत खोबऱ्याचा वापर सर्वाधिक केला जातो. या काळात खोबऱ्याला मागणी वाढते. उत्सवाच्या काळात नारळाची आवक न वाढल्यास खोबऱ्याच्या दरात उच्चांकी वाढ होईल, अशी शक्यता व्यापारी अशोक लोढा यांनी व्यक्त केली. बाजारात सध्या खोबऱ्याचा तुटवडा जाणवत आहे. गोटा खोबऱ्याच्या एका नगामागे चार ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. नारळाच्या दरात पाच ते सात रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एका नारळाचे दर ४० रुपयांच्या पुढे आहेत. नारळाचे उत्पादन घटल्याने गोटा खोबऱ्याच्या दरात वाढ झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.