पुणे : युद्धजन्य परिस्थितीमुळे पुणे, मुंबई, ठाण्यासह राज्यभरातील किरकोळ, तसेच घाऊक बाजारात अन्नधान्य खरेदीसाठी गर्दी होऊ लागली होती. गेल्या दोन ते तीन दिवसांत गहू, ज्वारी, बाजरीच्या दरात क्विंटलमागे १०० रुपयांनी वाढ झाली आहे.
मार्केट यार्डातील भुसार बाजारात धान्याला मागणी वाढली आहे. किरकोळ बाजारात अन्नधान्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारातून शहर, तसेच परिसरातील किराणा माल विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अन्नधान्याच्या दरात पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. अन्नधान्याची खरेदी करण्यात येत होती. गहू, ज्वारी आणि बाजरीला मागणी वाढल्याने दरात गेल्या दोन ते तीन दिवसांत क्विंटलमागे १०० रुपयांनी वाढ झाली आहे. बाजारात तांदळाची आवक चांगली होत असून, तांदळाचे दर स्थिर आहेत. साठवणुकीसाठी अन्नधान्य खरेदी करण्याचा ग्राहकांचा कल वाढला आहे.
कडधान्य, चनाडाळ, बेसन, साखर, खाद्यतेल, तुपाच्या मागणीत वाढ झाली आहे. चना डाळ आणि बेसनाच्या दरात किलोमागे तीन रुपयांनी वाढ झाली आहे. मार्केट यार्डातील घाऊक फळभाजी बाजारात पुणे विभाग, तसेच दक्षिण भारतातून फळे, भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होते. उत्तरेकडील राज्यातून तुलनेने शेतीमालाची आवक कमी होते. युद्धजन्य परिस्थितीचा फारसा परिणाम फळभाजी बाजारातील खरेदी-विक्रीवर झाला नाही. फळे, भाजीपाल्याचे दर स्थिर असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ आणि अमोल घुले यांनी दिली.
दरवर्षी उन्हाळ्यात साठवणुकीतील धान्याची खरेदी केली जाते. युद्धजन्य परिस्थितीमुळे मार्केट यार्डातील भुसार बाजारात किरकाेळ ग्राहक, तसेच किराणा माल विक्रेत्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी वाढली होती. बाजारात अन्नधान्याच्या साठा मुबलक आहे. खाद्यतेल वगळता अन्य सर्व अन्नधान्याचे दर स्थिर आहेत.- राजेंद्र बाठिया, माजी अध्यक्ष, दी पूना मर्चंट्स चेंबर
भारतीय बासमतीला पसंती
पाकिस्तानातील अस्थिरतेमुळे जगभरातून गेल्या काही वर्षांपासून भारतीय बासमती तांदळाला मागणी वाढली आहे. गेल्या पाच वर्षांत भारतीय बासमतीची निर्यात ३० लाख टनांवरून ६० लाख टनांवर पोहोचली आहे, असे मार्केट यार्डातील तांदूळ व्यापारी, निर्यातदार राजेश शहा यांनी नमूद केले.