शहराच्या मध्य वस्तीतील अखिल मंडई मंडळाच्या श्री शारदा गजानन मंदिरात बुधवारी पहाटे चोरटय़ाने ४३ लाख रुपये किमतीचे दोन किलो शंभर ग्रॅम सोन्याची आभूषणे, पूजा साहित्य असा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. चोरीची पूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली असून मिळालेल्या चित्रीकरणावरून चोरटय़ाचा शोध सुरू आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेशोत्सव काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना ही घटना घडल्यामुळे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. पुण्यातील मंडई परिसर हा मध्य वस्तीत असून तो नेहमीच गजबजलेला असतो. या परिसरातच अखिल मंडई मंडळाचे श्री शारदा गजानन मंदिर आहे. दोन वर्षांपूर्वीच या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. या मंदिरातील श्री शारदा गजाननाची मूर्ती ही शंभर वर्षे जुनी आहे. या मूर्तीच्या अंगावर सोन्याची आभूषणे घालण्यात आलेली होती.
श्री शारदा गजानन मंदिर मंगळवारी रात्री बंद करण्यात आले होते. पहाटे पावणेपाचच्या सुमारास एक चोरटा मंदिरात आला. सभा मंडपाच्या लगत असलेल्या छोटय़ाशा रस्त्यामधून तो पुढे गेला. मंदिराच्या महिरपीला काचा बसविण्यात आलेल्या आहेत. त्या काचा चोरटय़ाने सिमेंटचा ब्लॉक मारून फोडल्या व मूर्तीवरील सोन्याचा हार, मंगळसूत्र, साखळी, पूजा साहित्य असा ४३ लाख रुपयांचा ऐवज घेऊन तो पसार झाला. नेहमीप्रमाणे सकाळी सहाच्या सुमारास पुरोहित श्रीपाद कुलकर्णी हे मंदिरात आले. महिरपीची काच फुटल्याचे त्यांनी पाहिले. त्यांना मूर्तीच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी काही अंतरावरच असलेल्या मंडई पोलीस चौकीत धाव घेतली. तसेच, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, संजय मते, भोला वांजळे, मोहन ढमढेरे यांनी मंदिराकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस, गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पाहिले असता चोरीची पूर्ण घटना चित्रित झाल्याचे आढळून आले. या प्रकरणी चोरटय़ाला पकडण्यासाठी पोलिसांची पथके काम करीत आहेत.
याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत भट यांनी सांगितले, की सीसीटीव्ही चित्रीकरणामध्ये आरोपी कैद झाला आहे. त्याची माहिती काढण्याचे काम सुरू आहे. या मंदिराला लोखंडी ग्रील बसविण्यात आलेले नव्हते.
अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी सांगितले, की पोलीस हा गुन्हा उघडकीस आणून चोरटय़ांचा माग काढतील असा आम्हाला विश्वास आहे. पोलिसांना सीसीटीव्हीचे फुटेज उपलब्ध करून देण्यात आले आहे.
चोरीच्या अगोदर चोरटय़ाकडून परिसराची पाहणी
मंडईचा परिसर हा नेहमीच गजबजलेला असतो. पहाटे पाच वाजल्यापासूनच नागरिकांची रेलचेल सुरू होते. बुधवारी पहाटे चोरीच्या अगोदर चोरटय़ाने मंदिर परिसराची पाहणी केल्याचे सीसीटीव्हीत आढळून आले आहे. मंदिराला लागून असलेल्या छोटय़ा मार्गातून ताे महिरपीपर्यंत गेला. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा असल्याचे त्याला दिसले. त्यानंतर त्याने तंबाखू खाल्ली आणि कॅमेऱ्याची दिशा दुसऱ्या बाजूला केली. त्यानंतर महिरपीवर सिमेंटचा ब्लॉक मारून आत प्रवेश केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला असून कार्यकर्त्यांनी चोरटय़ाचे छायाचित्र व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचविले आहे.