scorecardresearch

पुणे : शहरात पादचारी महिलांचे दागिने हिसकावून चोरण्याचे प्रकार वाढले

दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलांचे सुमारे ९० हजारांचे दागिने हिसकावून चोरल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

पुणे : शहरात पादचारी महिलांचे दागिने हिसकावून चोरण्याचे प्रकार वाढले
प्रातिनिधिक फोटो-लोकसत्ता

शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलांचे सुमारे ९० हजारांचे दागिने हिसकावून चोरल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. सोमवार पेठेतील शाहू उद्यान आणि सिंहगड रस्त्यावर या घटना घडल्या. याबाबत एका महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला रास्ता पेठेत राहायला आहेत. त्या शाहू उद्यान परिसरातून निघाल्या होत्या. दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे तपास करत आहेत.

हेही वाचा >>> खंडाळ्यात जलतरण तलावात बुडून पर्यटक युवकाचा मृत्यू

सिंहगड रस्त्यावर एका महिलेचे ४० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कामावरुन घरी निघाली होत्या. सिंहगड रस्त्यावरील गिरीजा हाॅटेलसमोरील बसथांब्यावर त्या थांबल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर तपास करत आहेत. दरम्यान, मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी परिसरात एका तरुणाचा मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. शंकर नवनाथ हनुवते (वय ३१, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) याने या संदर्भात खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हनुवते रात्री जेवण करुन शतपावली करत होता. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्याच्या हातातील सात हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 20:18 IST

संबंधित बातम्या